पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आतापासूनच सुक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे. या नियोजनात ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्णालये, खाटांचे नियोजन (बेड मॅनेजमेंट), गंभीर रुग्ण व त्यावरील उपचार, व्हेंटीलेटरवरील रुग्ण, ॲक्टिव्ह आणि त्यांच्यावरील उपचाराचे नियोजन आदी बाबींचा समावेश करण्यात यावा, असेही देशमुख यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील कोविड प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजनासाठीची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याशिवाय तालुकास्तरावर दररोज सायंकाळी सात वाजता तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
यानुसार कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्णालये व बेड मॅनेजमेंटची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्याकडे तर, गंभीर रुग्ण, व्हेंटिलेटरवरील रुग्ण व अतिदक्षता विभागातील रुग्णांबाबतचे दैनंदिन अहवाल, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल दररोज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कोरोनाचा दैनंदिन आढावा, नियंत्रण, डाटा अपडेशनबाबत तालुकास्तरीय समित्या कार्यान्वित करणे, कंटेन्मेंट झोन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अहवाल, कोविड पोर्टलवर सर्व रुग्णांबाबतच्या नोंदी अद्ययावत करणे, लसीकरण केंद्रे कार्यान्वित करणे आदींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.