पिंपरी - "समलिंगी जोडप्यांची राहणी,' "भारतीय समलिंगी जोडप्यांचा विवाह', "बॉलिवूडशी एलजीबीटीचा संबंध,' "कलम 377 चा ऐतिहासिक निकाल...' "ट्रान्समॅन व ट्रान्सवूमन', अशा ओतप्रोत व्यथांच्या कथा समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी व द्विलिंगी (एलजीबीटी) समाजाने राज्यातील पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या आहेत. कोणत्याही नात्यात भेदभाव न करता कालबाह्य विचारसणीला फाटा देण्याची आता गरज आहे. समाजात केवळ व्यक्तिमत्त्वाचा आरसा स्वच्छ असून चालत नाही, तर अस्मितेचा गुणगौरव करून तिला स्वतंत्र जगण्याचा अधिकार मिळायला हवा, हे या अंकातून समाजापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न "एलजीबीटी'ने केला आहे.
व्यक्तीच्या नैसर्गिक पैलूचा आदर केला पाहिजे यासाठी पुण्यातील "समपथिक' ट्रस्टने दिवाळी अंक काढला आहे. एलजीबीटी (एलजीबीटी : लेस्बिअन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) घटकाला मिळालेला न्याय (377 कलम -समलिंगी संबंधांना गुन्ह्यांच्या यादीतून वगळणे) याचे स्वागत दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठातून करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. एलजीबीटी हा घटक कोणती विकृती किंवा आजार नाही, तर तो समाजातील एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे.
ट्रस्टने पन्नास दिवाळी अंकांची छपाई केली. तीन दिवसांत सर्व प्रती विकल्या गेल्या. मागणी वाढल्याने अजून शंभर अंकांची छपाई केली जाणार आहे. अंकाचा केवळ लेखन, मुद्रण व छपाई खर्च गृहीत धरून किंमत साधारण ठेवली आहे. या अंकाचे हे पहिले वर्ष आहे. यामध्ये कोणतीही व्यावसायिक जाहिरात नाही. ज्या आहेत, त्या केवळ एलजीबीटी समाजाच्याच आहेत. एलजीबीटी घटकाने एकत्रित येऊन हा अंक काढला आहे. याचे संपादक ट्रस्टचे बिंदुमाधव खिरे आहेत. तर यातील सर्व लेख एलजीबीटी व्यक्तींनी लिहिलेले आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील काही व्यक्तींनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एलजीबीटीचे शब्द माहीत होण्यासाठी अंकात शब्दकोश दिला आहे.
डिजिटल अंक हवा
एलजीबीटी घटकाला वाचण्यासाठी डिजिटल दिवाळी अंक हवा आहे. हा घटक समाजात अजूनही मोकळेपणाने व्यक्त होत नाही. कुटुंबात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने अंक खुलेपणाने वाचू शकत नसल्याच्या व्यथा त्यांनी संपादकांकडे व्यक्त केल्या. या वर्षी अंकाला मागणी वाढल्याने केवळ त्यांच्यासाठीच पुढील वर्षी हा अंक डिजिटल करण्यात येणार आहे. शिवाय या अंकाचे मोफत वितरणही होणार आहे.
अंकात काय वाचाल?
समलिंगी समाजाचा प्रवास तसेच समाजात मिळणारी अपमानास्पद वागणूक, जगताना होत असलेली घुसमट, न्यायदेवतेचा आधार, लिंगबदलाचा प्रवास, आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचे दु:ख, बॉलिवूड आणि समलैंगिक संबंध, समलिंगी जोडप्यांच्या विवाह कथा, कविता, समलिंगी स्त्रियांच्या मुलाखती, तृतीयपंथीयांचे आत्मकथन, तज्ज्ञांच्या मुलाखती, समलिंगी पाल्याच्या पालकांची मुलाखत अशा कथा यात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.