गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. रानडे यांच्या ‘कुलगुरू पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा’ मुद्दा गाजत असताना हे प्रकरण न्यायालयात गेले. यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता डॉ. रानडे यांनी गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना राजीनामा दिल्याचे पत्र दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोखले संस्थेच्या कुलगुरूपदी डॉ. रानडे यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता. डॉ. रानडे यांच्याकडे कुलगुरू पदासाठी आवश्यक असणारी पात्रता नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावरून संस्थेचे तत्कालीन कुलपती डॉ. बिबेक देबरॉय यांनी सत्यशोधन समिती नियुक्त केली. या समितीच्या शिफारशीनुसार डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, त्यानंतर या निर्णयाला डॉ. रानडे यांनी थेट न्यायालयातच आव्हान दिले.