तळेगाव ढमढेरे : माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे समाजातील प्रत्येक घटकाशी घनिष्ठ संबंध होते. आयुष्यभर त्यांनी तळागाळातील सामान्य माणसासाठी काम केले. राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी विशेष भर दिला. कोणताही गाजावाजा न करता अनेक होतकरूंना त्यांनी मदतीचा हात दिला.
त्यांनी घडवलेले अनेक कार्यकर्ते राजकारण व समाजकार्यात पुढे आले. धर्मनिरपेक्षता व समाजवाद त्यांनी जीवनभर जपला असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
माजी खासदार दिवंगत संभाजीराव काकडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.सप्तर्षी बोलत होते. खासदार संभाजीराव काकडे स्मृती फाउंडेशनतर्फे कोथरूड येथील गांधी भवन येथे स्मृतिदिनाचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ. के.एच.संचेती, डॉ.सुरेश शिंदे, डॉ.ज्ञानेश गवारे, डॉ. अंजली पानगव्हाणे, बाळासाहेब काशीद, संजय नहार व चंद्रकांत गवारे यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कंठावती काकडे, श्याम काकडे, पृथ्वीराज काकडे, डॉ. एकनाथ खेडकर, तृप्ती देसाई, शिवाजीराव भुजबळ, आर. के. हरगुडे, भाऊसाहेब साकोरे, एन.डी. निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले की, संभाजीराव काकडे हे बहु आयामी व सर्वसमावेशक व्यक्तिमत्व होते. त्यांच्यात सहनशीलता व प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याचे गुण होते. समाजासाठी जास्तीत जास्त काम कसे करता येईल याचाच ते नेहमी विचार करायचे असे मत डॉ. महाजन यांनी व्यक्त केले.
माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, संभाजीराव काकडे यांचे देशपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते परंतु त्याचा उपयोग वैयक्तिक फायद्यासाठी न करता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच त्यांनी केला. कोणत्याही लाभाच्या पदाची अपेक्षा न करता लोकांच्या अडचणी समजून निवारण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ. के. एच. संचेती, नाथाभाऊ शेवाळे, ललितभाई रुणवाल आदींनी संभाजीराव काकडे यांच्या विषयीच्या आठवणी मनोगतातून जागृत केल्या.
कार्यक्रमाचे संयोजन उद्योजक शिवाजीराव मांढरे यांनी केले. संभाजीराव काकडे स्मृती फाऊंडेशनचे अध्यक्ष कांतीलाल गवारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे यांनी केले. सतीश काकडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.