Pune News : समाजातील देवदूतांचा आज होणार गौरव

‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ असा सुविचार आपण नक्की ऐकला असेल. संकटकाळी जिवाची पर्वा न करता मदतीला धावणारे देवदूत आता अभावानेच आढळतात.
angel
angelsakal
Updated on

पुणे - ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ असा सुविचार आपण नक्की ऐकला असेल. संकटकाळी जिवाची पर्वा न करता मदतीला धावणारे देवदूत आता अभावानेच आढळतात. अशा परिस्थितीत मानवतेच्या तत्त्वांना मूर्त स्वरूप देत समाजात आपल्या कृतीने अनुकरणीय आदर्श निर्माण केलेल्या व्यक्ती सामान्य ते असामान्य अशी वाटचाल साकारतात. अशाच काही देवदूतांना सकाळ माध्यम समूह बुधवारी मानाचा मुजरा करणार आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला हल्लेखोरापासून वाचविणारे लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील असोत, दहशतवाद्यांना पकडणारे पोलिस कर्मचारी अमोल नजन आणि प्रदीप चव्हाण असोत, एक हजारापेक्षा अधिक पर्यटकांना जीवदान देणारी शिवदुर्ग मित्र संस्था असो किंवा पाच जणींचे प्राण वाचविणारे संजय सीताराम माताळे, समाजातील या देवदूतांचा बुधवारी (ता. २०) सन्मान करण्यात येणार आहे.

‘सकाळ’चे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल.

लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील -

२७ जूनला सकाळी नऊ वाजून ५० मिनिटांनी सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळ एक तरुण हातात कोयता घेऊन तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत होता. त्यावेळी विद्यानिकेतन अभ्यासिकेकडे जात असलेल्या जवळगे आणि पाटील यांनी त्याला तरुणीवर कोयत्याने हल्ला करताना पाहिले. दोघांनी जिवाची पर्वा न करता तरुणाचा प्रतिकार केला. तरुणीचा जीव वाचवून हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अमोल नजन आणि प्रदीप चव्हाण -

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फरार जाहीर केलेल्या हिटलिस्टमधील कट्टर दहशतवाद्यांना पकडल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. १८ जुलै २०२३ रोजी रात्र गस्तीवर असलेल्या नजन आणि चव्हाण यांना बधाई चौक, कोथरूड येथे तीन संशयित व्यक्ती दुचाकी चोरताना आढळून आले. पाठलाग करून त्यांना पकडून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केल्यावर ते दहशतवादी असल्याचे समजले.

संजय सीताराम माताळे -

गोऱ्हे खुर्द येथील शेतकरी माताळे १५ मे २०२३ रोजी नात्यातील व्यक्तीच्या सावडण्याच्या विधीसाठी खडकवासला धरणालगतच्या स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी महिला व मुलींचा ‘वाचवा वाचवा’ असा आवाज येऊ लागला. काही मुली व महिला पाण्यात बुडत होत्या. माताळे यांनी पाण्यात उडी मारून सातपैकी पाच जणींना पाण्याबाहेर काढले.

शिवदुर्ग मित्र, लोणावळा -

डोंगर भागात अडकलेल्या व जखमी झालेल्या एक हजारापेक्षा अधिक पर्यटकांना जीवदान देणारी व दऱ्याखोऱ्यांतील, धबधब्यांवरून पडलेले २५० हून अधिक मृतदेह शोधून काढणारी संस्था. १९८०मध्ये विष्णू गायकवाड यांनी स्थापन केलेला ग्रुप. गडकिल्ले फिरणे व त्यांचे संवर्धन करणे हा त्यामागचा उद्देश होता.

मृतदेह दऱ्याखोऱ्यांतून तसेच पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम संस्था करते. डोंगरभागात, गडकिल्यांवर फिरायला येऊन जखमी झालेले पर्यटकही रुग्णवाहिकेपर्यंत पोचवण्याचे काम करते. कुठलाही मोबदला न घेता स्वतःचा वेळ खर्च करून टीम आपले कर्तव्य बजावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.