आकाशदर्शन : जुलैमध्ये उन्हाळ्याचाच अनुभव

पृथ्वी सूर्यापासून दुरात दूर अशा स्थानावर ६ जुलै रोजी पोचत आहे. या दिवशी ती सूर्यापासून १५,२०,९५,२९५ किलोमीटर अंतरावर असेल.
Astronomy
AstronomySakal
Updated on

पृथ्वी सूर्यापासून दूर

पृथ्वी सूर्यापासून दुरात दूर अशा स्थानावर ६ जुलै रोजी पोचत आहे. या दिवशी ती सूर्यापासून १५,२०,९५,२९५ किलोमीटर अंतरावर असेल. पृथ्वीच्या सूर्याभोवतालच्या कक्षेतील या स्थानास ‘अपसूर्य’ किंवा ‘अपहेलियन’ म्हणून ओळखले जाते. पृथ्वीची सूर्याभोवतालची कक्षा पूर्णपणे गोलाकार नसून किंचित लंबवर्तुळाकार असल्याने पृथ्वी जानेवारीमध्ये सूर्याजवळ, तर जुलैमध्ये सूर्यापासून दूर जाते. वर्षभरात दोन वेळा पृथ्वी सूर्यापासून नेहमीपेक्षा ३ टक्‍के जवळ किंवा दूर जाते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून दूर जाते, तेव्हा सूर्यबिंब किंचित छोटे दिसून पृथ्वीकडे येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता ६.७ टक्‍के कमी होते. यामुळे जुलै महिन्यात पृथ्वी सूर्यापासून दूर असताना आपणास हिवाळ्याचा अनुभव यावयास हवा. मात्र पृथ्वीवरचे ऋतुमान पृथ्वी-सूर्याच्या अंतरावर अवलंबून नसून ते पृथ्वीच्या कललेल्या अक्षावर अवलंबून असते. याचमुळे आपल्या उत्तर गोलार्धात जुलै महिन्यात हिवाळ्याऐवजी उन्हाळ्याचाच अनुभव येतो.

ग्रह -

बुध - सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर बुध दिसेल. तो सूर्यापासून दुरात दूर अशा २२ अंश अंतरावर जुलैच्या ५ तारखेला पोचेल. या वेळी बुध सूर्योदयापूर्वी जवळ-जवळ दीड तास उगवेल. गेल्या महिन्यात रोहिणी ताऱ्याच्या खालच्या बाजूस दिसत असलेला बुध आता रोहिणीची साथ सोडून क्षितीजाकडे सरकताना दिसेल. चंद्रकोरीजवळ बुध ८ जुलै रोजी असेल. या वेळी त्याची तेजस्विता ०.२ असल्याने सहज दिसू शकेल. या महिन्यात तो झपाट्याने सूर्याकडे सरकत असल्याने महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून संधीप्रकाशामुळे दिसू शकणार नाही.

शुक्र - संध्याकाळी उत्तर-पश्‍चिम क्षितिजावर शुक्राचा तेजस्वी ठिपका दिसेल. आकाश स्वच्छ असल्यास महिन्याच्या प्रारंभी शुक्र कर्क राशीतील पुष्य नक्षत्राच्या परिसरात पाहता येईल. हे नक्षत्र ‘एम-४४’ नावाने ओळखले जाते. हा एक छानसा तारकागुच्छ असून त्यातील ३०-३५ तेजस्वी तारे दाटीवाटीने एकमेकालगत दिसतात व म्हणूनच या तारकागुच्छास ‘बी हाईव्ह क्‍लस्टर’ किंवा ‘मधाचे पोळे’ म्हणूनदेखील ओळखले जाते. शुक्र या तारकागुच्छाच्या उत्तरेकडून वर सरकत ३ जुलै रोजी तारकागुच्छाच्या जवळ दिसेल. तो वरच्या बाजूस दिसत असलेल्या नारिंगी रंगाच्या मंगळाजवळ १२-१३ जुलै रोजी पोचेल. या वेळी या दोघांतील अंतर फक्‍त १ अंश होईल. मंगळाला मागे टाकत शुक्र त्याच्या वरच्या बाजूस असलेल्या मघा ताऱ्याजवळ २१-२२ जुलै रोजी दिसू लागेल. जुलै महिन्यात शुक्राचे ११ विकलांचे बिंब उणे ३.९ तेजस्वितेचे दिसेल.

मंगळ - अंधार पडताच उत्तर-पश्‍चिम क्षितिजावर कर्क राशीतील मंगळ तेजस्वी शुक्राच्या वरच्या बाजूस दिसू लागेल. मंगळ हळूहळू क्षितिजाकडे सरकत असून त्याची १२ तारखेला शुक्राबरोबर युती होईल. युतीवेळी हे दोघे जरी एक अंश इतक्‍या कमी अंतरावर दिसत असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांपासून जवळजवळ १६ कोटी कि.मी. दूर अंतरावर असतील. मंगळ क्षितिजाकडे सरकत असल्याने लवकर मावळत जात महिना अखेरीस रात्री साडेआठच्या सुमारास मावळेल. त्याची तेजस्विता १.८ असेल. चंद्रकोरीजवळ मंगळ १२ जुलै रोजी दिसेल.

गुरू - सूर्यमालेतील सर्वांत मोठा व तेजस्वी असा गुरू जुलै महिन्यात रात्रभर दिसेल. महिन्याच्या प्रारंभी तो रात्री साडेदहा वाजता उगवेल व महिन्याभरात लवकर लवकर उगवत जात महिना अखेरीस रात्री साडेआठ वाजता उगवेल. या महिन्यात तो कुंभ राशीत वक्री गतीने सरकताना दिसेल. गुरूचे मोठे असे ४८ विकलांचे बिंब उणे २.७ तेजस्वितेने चमकताना पाहता येईल. तो आपल्यापासून ६३ कोटी किलोमीटर अंतरावर असेल. या महिन्यात चंद्राजवळ गुरूस २५ तारखेला पाहता येईल.

शनी - दक्षिणपूर्व क्षितिजावर पिवळसर रंगाचा शनी दिसेल. या महिन्यात तो अंधार पडल्यापासून रात्रभर दिसेल. पुढच्याच महिन्यात त्याची प्रतियुती होत असल्याने तो ठळकपणे दिसत आहे. शनी आपल्यापासून १३४ कोटी कि.मी. अंतरावर आहे. तो मकर राशीत दिसत असून, त्याच्या १८ विकलांच्या बिंबाभोवती ४२ विकलांची कडी दिसतील. शनीची तेजस्विता ०.२ असल्याने दक्षिण आकाशातील मंद ताऱ्यामध्ये तो सहज ओळखू येईल. चंद्राजवळ शनी २४ जुलै रोजी दिसेल.

युरेनस-नेपच्यून - दक्षिण-पूर्वेस असलेल्या मेष राशीत युरेनस दिसेल. या राशीच्या ओमिक्रॉन ताऱ्याजवळ महिना अखेरीस युरेनस दिसेल. त्याची तेजस्विता ५.८ असेल. नेपच्यून कुंभेत असून मीन राशीच्या मीनपंचकाजवळ दिसेल. त्याची तेजस्विता ७.७ असेल.

चंद्र - ज्येष्ठ अमावस्या १० जुलै रोजी ६.४७ वाजता होईल, तर आषाढ पौर्णिमा २४ जुलै रोजी ८.०७ वाजता होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,०५,३४२ कि.मी.) ६ जुलै रोजी, तर पृथ्वीजवळ (३,६४,५२० कि.मी.) २१ जुलै रोजी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()