Diwali 2020 : दिपावली सण आपण का साजरा करतो? जाणून घ्या काय आहे रहस्य?

Diwali 2020 : दिपावली सण आपण का साजरा करतो? जाणून घ्या काय आहे रहस्य?
Updated on

दीप म्हणजे दिव्याची पूजा रोजच होते; परंतु अनेक दीप, तेही एका ओळीत मांडले गेले, की त्याची आवली म्हणजे दीपावली तयार होते. अग्नीची पूजा हा दीपावलीचा मूळ सण. गुरुद्वादशीपासून दीपावलीची सुरुवात होते. अष्टवसू या देवता समजल्या जातात. आठ दिशांचे आठ असे अष्टवसू असतात. अष्टवसूंमधील मुख्य देवता अग्नी ही आहे. दीपावलीच्या अशाच अनेक रहस्यांबद्दल...

‘सकाळ’च्या सर्व वाचकांना व कुटुंबीयांना दीपावलीच्या शुभेच्छा. 

भारतात प्राचीन काळापासून दसरा-दीपावलीसारखे सण साजरे केले जात असत. रावणाचा वध झाला, त्या दिवशी दसरा साजरा केला जातो, असे नसून दसरा हा पूर्वीपासूनच साजरा केला जाणारा सण आहे. दीप म्हणजे दिव्याची पूजा रोजच होते. परंतु, अनेक दीप, तेही एका ओळीत मांडले गेले, की त्याची आवली म्हणजे दीपावली तयार होते. अग्नीची पूजा हा दीपावलीचा मूळ सण. भारतात ज्या वेळी सणांची योजना केली गेली किंवा मनुष्य ज्या वेळी सर्वसंपन्न होतो, त्या वेळी कला वाढतात. जीवनाला आवश्‍यक असणाऱ्या सुखसाधनांमध्ये भर पडते, एखादा मनुष्य घर घेतो, एखादा मनुष्य दागिने घेतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षा ऋतूनंतर शेतीत पीक तयार झालेले असते. अशा वेळी दीपावली हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवापासून जणू जीवनाची खरी सुरुवात होते; म्हणून पाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे, असे समजले जाऊन दीपावली हा सण साजरा केला जातो. 

या उत्सवामागचे रहस्य कळून त्यानुसार सण साजरा करणे अधिक श्रेयस्कर ठरते. हे रहस्य ज्ञानी मनुष्य समजावून सांगतो, यादृष्टीने गुरुद्वादशीपासून दीपावलीची सुरुवात होते. अष्टवसू या देवता समजल्या जातात. आठ दिशांचे आठ, असे अष्टवसू असतात. अष्टवसूंमधील मुख्य देवता अग्नी ही आहे. या धनशक्‍तीमध्ये स्थिर व चल, असे दोन भाग होतात. स्थावरसंपत्ती ही अचल व लक्ष्मी ही चल संपत्ती. अष्टवसूंमधील मुख्य अग्नी हा मुळातील संपत्ती. सर्व संपत्तीचा कारक अग्नी आहे. अग्नी म्हणजे तेज. अग्नीमुळे कर्म केले जाते आणि कर्म केल्यास त्यामुळे लक्ष्मी प्रकट होते. मनुष्याच्या शरीरातही अशाच प्रकारे अग्नीची एक शृंखला आहे. दोन भुवयांमध्ये असणाऱ्या ग्रंथीच्या ठिकाणी अग्नी असतो. शरीरातील इतर सर्व अग्नींची शृंखला या ज्योतिरूपी अग्नीच्या आधिपत्याखाली असते. शरीरातील सर्व अग्नींनी नीट काम केले, तर मनुष्याला पहिले धन-आरोग्य मिळते. आधुनिक विज्ञानात या अग्नीला हॉर्मोन्स अशी संज्ञा देऊ शकतो. श्रीमद‌भगवद्‌गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेले आहे ‘वसूनां पावकश्चास्मि’. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१) पावक म्हणजे अग्नी हा पहिला वसू. 
२) अग्नीपासून पसरणारी प्रभा-प्रभास हा दुसरा वसू. 
३) तिसरा वसू सूर्य. 
४) सूर्याची चलशक्‍ती व स्पंदने हा चौथा वसू. 
५) पाचवा वसू आहे पृथ्वी. पृथ्वीला वसुंधरा असे म्हणतात; कारण तिने सर्वांचे धारण केलेले आहे. पृथ्वी आपल्या जीवनाचेही धारण करते. 
६) पृथ्वीची स्थिरता हा सहावा वसू. पृथ्वी स्थिर नसली, तर पुढे काही होऊ शकणार नाही. 
७) आप म्हणजे पाणी हा सातवा वसू आहे. पाणी हेच जीवन आहे. 
८) पाण्याची उत्क्रांती होऊन सोम तयार होतो, हा आठवा वसू. या सोमावर जाणीव तयार होते, जीवन चालते. सोम हे मेंदू व मेरुदंडाभोवती असलेले जल आहे. 
असे आठ वसू आहेत. 

वसुबारस
वसुंधरा स्थिर आहे. या पथ्वीचे प्रतीक म्हणून सर्व प्राण्यांमधील श्रेष्ठ गाय, जी मनुष्याच्या बरोबर राहू शकते, तिची पूजा करणे हे पृथ्वीची पूजा करण्यासारखे आहे. यामुळे वसुबारसेच्या दिवशी गायीची पूजा केली जाते. यानंतरच्या दिवाळीच्या दिवसांत इतर वसूंची आपसूक पूजा होते. वसुबारसेपासून किंवा याच्या आदल्या दिवसापासून दिव्यांची ओळ (आवली) लावून तेजाची उपासना करणे अपेक्षित असते. अशी तेजाची पूजा करणाऱ्यांना भा-रतीय (भा म्हणजे तेज) म्हटले गेले. 

धनत्रयोदशी
वसुबारसेच्या दुसऱ्या दिवशी येते धनत्रयोदशी. या दिवशी जे धन स्थिर असते त्याचे म्हणजेच अचल संपत्तीचे पूजन केले जाते. पूजा करणे म्हणजे महत्त्व ओळखणे, प्रेमाने आवाहन करणे. अचल धनाच्या ताकदीवर, शक्‍तीवर चल धन मोजले जाते. चल संपत्ती व अचल संपत्ती दोहोंचा समतोल ठेवला नाही, तर जवळ असलेले धन उपयोगी पडत नाही. जवळ असलेल्या धनाचा उपयोग न झाल्यामुळे हलके हलके जीवन दुःखप्रद होत जाते. पृथ्वीवर धन प्रकट झाले आहे वनाच्या रूपाने. वनांतील वृक्षसंपदा, शेतात येणारे पीक यांच्यामुळेच मनुष्यमात्राचे आरोग्य नीट राहते. तेव्हा धन्वंतरी ही आरोग्याची देवता धनसंपत्तीची देवता होय. धन्वंतरी देवता प्रकट झाली आहे समुद्रातून. जमीन खोदल्यावर मिळणारी रत्ने हेही पृथ्वीतून मिळालेले धनच. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींची पूजा केली जाते. वने, शेते, घर-दार, कारखाने ज्यांच्या जोरावर चल संपत्ती तयार होते त्यांची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते. ज्याला आनंद घ्यायचा आहे, त्याची बंधने जाणे आवश्‍यक असते. शरीरात निर्माण झालेली अशुद्धी दूर होऊन शरीर शुद्ध होणे आवश्‍यक असते. शरीराची अशुद्धी दूर झाल्याशिवाय मन शुद्ध होत नाही; मन शुद्ध झाल्याशिवाय हे सांगितलेले रहस्य कळणार नाही. शरीराची शुद्धी झाली नाही तर वसुधेची, धन्वंतरींची कृपा होऊ शकणार नाही. दीपावलीच्या आधी घर साफ केलेले असते, रंगरंगोटी केलेली असते, घरासमोर एक विशेष प्रकारच्या दगडाच्या चुऱ्यापासून तयार केलेल्या रांगोळीपासून रांगोळ्या काढलेल्या असतात, धनत्रयोदशीच्या दिवसापासून घर सजविलेले असते; जेणेकरून येणाऱ्या अभ्यागतांचे मन प्रसन्न होईल. धन्वंतरींच्या ध्यानाचा श्लोकाचा अर्थ पाहिल्यास लक्षात येते, की धन्वंतरी जीवनाला गतिमान करणारे, संपर्क स्थापित करणारे, विषतत्त्व बाहेर काढणारे आहेत. 

नरकचतुर्दशी
यानंतरचा दिवस असतो नरकचतुर्दशीचा. हा शरीरशुद्धीचा दिवस. शरीरात साठलेली विषारी तत्त्वे बाहेर काढण्याचा, मनात साठलेले नकारात्मक विचार बाहेर काढण्याचा हा दिवस. या दिवशी पहाटे उठून मसाज-अभ्यंग करून, ओवाळून शरीरातील अग्नी जागृत केला जातो. पहाटेच्या वेळी सर्वत्र दिव्यांच्या ओळी लावल्या जातात. शरीराला योग्य असणारे, आरोग्य वाढविणारे पदार्थ सेवन केले जातात. 

यानंतर येणारे लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सण म्हणजे भारतीय संस्कारांचा परमोच्च बिंदू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.