पुणे - पांढरे शुभ्र कपडे, हातात निळा झेंडा आणि ‘जय भिम’चा जयघोष करणारे नागरिक दिसले म्हणजे जवळपासच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव चालला आहे, एवढं नक्की होते. १४ एप्रिल म्हटलं की संपूर्ण भारतभरात नव्हे जगभरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडकर यांचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात ‘भीम जयंती’ म्हणून साजरा केला जातो.
आज एवढं मोठं स्वरूप धारण करणारी ‘भीम जन्मोत्सव’ नक्की केंव्हापासून सुरू झाला? कुठे सुरू झाला आणि कोणी सुरू केला? हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. त्याचाच आढावा घेण्याच हा प्रयत्न..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिला जन्मोत्सव म्हटल्यावर आपल्या मनात मुंबई, नागपूर, महू आदी शहरांचा विचार आला असेल. पण तसे मुळीच नाही. अनेक वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक चळवळींची मुहुर्तमेठ रोवणाऱ्या आपल्या पुण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम १४ एप्रिल १९२८ रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले.
बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवली होती. पुढेप्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.
यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे रणपीसेंनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली.
२४ ऑगस्ट १९५८ रोजी रणपिसे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत.
जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते असलेल्या जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८९८ मध्ये झाला. ज्या काळात शिक्षणाच्या सोयी वा सवलती उपलब्ध नव्हत्या. त्या काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले. यातच त्यांचा मोठेपणा आहे.
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. १९१८ ते २१ साली त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना करून सामाजिक सभा, संमेलने मौलिक व्याख्याने नाटके प्रौढांकरता रात्रीचे वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरूण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. तिचे ते कमांडर इन चीफ बनले. राजकारण त्यांनी जास्त केले नाही परंतु सामाजिक कार्याचे ते अध्वर्यू होते. समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
पुण्यात युवक परिषद भरवली गेली ती पुणे जिल्ह्यासाठी किंवा शहरासाठी नव्हती. त्यात संबंध महाराष्ट्रातील प्रतिनिधी आले होते. १९३९ मध्ये कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून गेले. त्याचे श्रेय रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.
महात्मा गांधी यांनी पुण्यात उपवास केला त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेसमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते. अशा रीतीने ते एक समाजसेवाच करत होते.
(संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक, लेखक - मिलिंद मानकर, लोकराज्य मासिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.