गावातील तरुणांच्या प्रयत्नांना यश;
अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त गाडेकर यांचीही मदत
शिक्रापूर (पुणे) : सततची पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या केंदूर (ता. शिरूर) येथील तरुणांच्या प्रयत्नांना नुकतेच यश आले. राज्याच्या जलसंधारण विभागाने तब्बल 1 कोटी 55 लाख रुपये खर्चाचे 15 सिमेंट बंधारे केंदूरसाठी मंजूर केले आहेत. हे सर्व बंधारे पुढील सहा महिन्यांत उभे राहतील. पुण्याचे अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांची यासाठी तरुणांना मोठी मदत झाली.
केंदूर, पाबळ परिसरात कायमच पाणीटंचाई असते. थिटेवाडी बंधारा कधीतरी शंभर टक्के भरतो. थिटेवाडी बंधाऱ्यात कळमोडी प्रकल्पातून पाणी यावे; तसेच चासकमान कालव्यातून कानिफनाथ उपसा सिंचन योजना व्हावी, यासाठी गावातील तरुणांनी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्याचदरम्यान गावातील ओढ्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यासाठी गावातील तरुणांनी मूळचे केंदूरचे असलेले प्रशांत गाडेकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यांनी याकामी तरुणांना मार्गदर्शन केले. तरुणांच्या पाठपुराव्यातून जलसंधारण विभागाने गावासाठी तब्बल 15 सिमेंट बंधाऱ्यांसाठी 1 कोटी 55 लाख मंजूर केले आहेत. याबाबतची माहिती या कामासाठी पाठपुरावा करणारे सूर्यकांत थिटे, घनश्याम गाडेकर, भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे, तुकाराम थिटे, बन्सी पऱ्हाड आदींनी दिली.
याबाबत जलसंधारण विभागाच्या येरवडा कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथून सांगण्यात आले की, केंदूर येथे उभारण्यात येणाऱ्या 15 बंधाऱ्यांची जागा गावातील तरुणांशी चर्चा करून निश्चित केलेल्या आहेत. निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार निश्चितीनंतर काम सुरू होण्यासाठी पुढील तीन महिने लागतील. हे सर्व 15 बंधारे पुढील सहा महिन्यांत बांधून पूर्ण होतील. त्यात सुमारे 0.05 टीएमसी पाणीसाठा होणार आहे.
माझ्या गावचे तरुण समस्यांबाबत केवळ तक्रारी करीत बसले नाहीत; तर त्यावर उपाययोजना आणि त्यासंबंधीचा पाठपुरावाही करीत आहेत. याचा अनुभव बंधारे मंजुरीबाबत घेत आहे. गावासाठी आणखीही खूप काही करायचे आहे, ग्रामस्थांच्या मदतीने कामे पूर्ण करण्यात येतील.
-प्रशांत गाडेकर,
अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त, पुणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.