Drunk and Drive Case : पालकांची चिंता वाढली; खासगी गुप्तहेरांची राहणार मुलांवर नजर

कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. परराज्यातील अनेक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे.
drunk and drive
drunk and driveesakal
Updated on

पुणे - कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. परराज्यातील अनेक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. शिक्षण किंवा नोकरीसाठी मुलांना पुण्यात पाठवणाऱ्या पालकांना त्यांच्या सुरक्षेची चिंता तर आहेच, मात्र त्यांची संगत कशी आहे? तो किंवा ती पुण्यात कसे राहतात? काय काय करतात? याची माहिती बाहेरून काढण्यासाठी चक्क डिटेक्टिव्हची (गुप्तहेर) मदत घेतली जात आहे. मागील एका आठवड्यात १०० हून अधिक पालकांनी आपल्या पाल्यांबद्दल माहिती घेण्यासाठी खासगी गुप्तहेरांकडे चौकशी केली आहे.

पुण्याला शिक्षणाची मातृभूमी म्हणतात. येथे अनेक उच्चशिक्षण संस्था आहेत. त्यामुळे लोक आपल्या मुलांना वैद्यक, अभियांत्रिकी आणि एमबीए शिक्षणासाठी पुण्याला पाठवतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा आदी राज्यांतून येणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे.

हे तरुण वसतिगृहात किंवा खासगी फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. मात्र आतापर्यंत लोकांना पुण्याची चिंता नव्हती. पण कल्याणीनगर मोटार अपघातानंतर पब आणि बारचे रात्रीचे जग समोर आले आहे. यामुळेच त्यांना मुलांची काळजी वाटू लागली आहे.

परराज्यात अथवा जिल्ह्यात राहून आपल्या मुलाला सुरक्षित कसे ठेवायचे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे काही पालकांनी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरुवात केली. पुण्यातील खासगी गुप्तहेर प्रिया काकडे यांनी या प्रकरणी दुजोरा दिला आहे. आतापर्यंत देशातील विविध राज्यांमधून सुमारे ४० जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून अनेक पालकांनी अशी चौकशी केली आहे. यात मुलींबद्दलची विचारणा अधिक आहे. काहींनी तर गरज पडल्यास मुलांना कॉलेजमधून काढून परत बोलावू, असेही सांगितले. मी आत्ताच तपास सुरू केला आहे. मुले खरेच शिकतात की चुकीच्या संगतीत पडून व्यसनाधीन झाली आहेत, हे काही दिवसांत कळेल.

- प्रिया काकडे, संचालिका, स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी

मुलांच्या घराबाहेरील हालचालींवर लक्ष

प्रिया यांनी सांगितले की, ज्यांची मुले पुण्यात शिकत आहेत, त्या पालकांना आता जास्त काळजी वाटत आहे. मुलांच्या घराबाहेरील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले जात आहे. त्यांचा मुलगा किंवा मुलगी बाहेर कशी वागते अथवा जगते? हे पालक त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विचारतात. तो/ती नीट अभ्यास करतो/करते की नाही? तो व्यसनाधीन झाला आहे का? दारू अथवा ड्रग्ज घेत आहेत का? दारू पिऊन गाडी चालवत तर नाही ना?

ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. शक्य असल्यास त्यांच्या मुलांचे व्हिडिओदेखील त्यांच्यासोबत शेअर करावे, असा आग्रह पालक धरत आहेत. उदाहरणादाखल इंदूरमधील एका जोडप्याला त्यांचा मुलगा नीट बोलत नसल्याने संशय वाढला. पालक म्हणतात की जेव्हा ते आपल्या मुलाला फोन करतात, तेव्हा तो व्यस्त असल्याचे कारण सांगतो. मित्रांकडे चौकशी केली असता ते सांगतात की आम्ही आता त्याच्या संपर्कात जास्त नसतो. त्यामुळे शेवटी त्यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्यासाठी फोन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.