या दिग्गजांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही...

झेडपीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठीची गटांची आरक्षण सोडत गुरुवारी (ता.२८) काढण्यात आली
these politician could not participate in zilla parishad election pune
these politician could not participate in zilla parishad election punesakal
Updated on

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, विवेक वळसे पाटील, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, प्रवीण माने, माजी कृषी सभापती सुजाता पवार, बाबूराव वायकर, मावळत्या सभागृहातील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर आदी दिग्गजांचे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा निवडून येण्याचे स्वप्न भंगले आहे. या दिग्गजांचे गट अन्य प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु यापैकी काही दिग्गजांचे गट हे महिलांसाठी राखीव झाल्याने, त्यांना त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची संधी मिळू शकणार आहे.

याउलट माजी अध्यक्ष देवराम लांडे, निर्मला पानसरे, माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील, माजी महिला बालकल्याण सभापती सुनीता गावडे, वैशाली पाटील, राणी शेळके, पूजा पारगे, मावळत्या सभागृहातील काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, माजी ज्येष्ठ सदस्या आशा बुचके, वीरधवल जगदाळे आदींना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळू शकणार आहे.

झेडपीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठीची गटांची आरक्षण सोडत गुरुवारी (ता.२८) काढण्यात आली. या सोडतीमुळे कोणाचे पत्ता कट आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक शाखेचे समन्वयक व उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विनायक राऊत आदी उपस्थित होते.

मावळत्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपली आहे. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आतापर्यंत ही आरक्षण सोडत लांबणीवर पडली होती. अखेर गुरुवारी ती पार पडली. या सोडतीमुळे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आगामी पंचवार्षिक निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर एकूण ८२ सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ही संख्या ७५ होती. त्यामुळे झेडपीच्या सदस्य संख्येत सातने वाढ झाली आहे. एकूण जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) ८, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एसटी) ६ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२जागा आरक्षित झाल्या आहेत.

महिलांसाठी ४१ जागा

पुणे जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी ४१ जागा (५० टक्के) या विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामुळे महिला सदस्यांची संख्या तीनने वाढली आहे. महिलांच्या एकूण जागांपैकी खुल्या गटातील महिलांसाठी २३, नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी ११, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी चार आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी तीन जागा राखीव झाल्या आहेत.

आशा बुचकेंना सलग पाचव्यांदा संधी

मागील सलग चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ माजी सदस्या आशा बुचके यांना सलग पाचव्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी याआधीच्या चारही निवडणुका या विविध गटांतून लढविल्या होत्या. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत या चारपैकी तीन गटात निवडणूक लढविण्यासाठी आशा बुचके पात्र आहेत. त्यामुळे त्या कोणत्याही एका गटातून निवडणूक लढवू शकणार आहेत.

प्रवर्गनिहाय आरक्षण

- एकूण जागा - ८२

- विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव - ४१

- खुला गट - ४६ (पैकी २३ महिला)

- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - २२ (पैकी ११ महिला)

- अनुसूचित जाती (एससी) - ०८ (पैकी चार महिला)

- अनुसूचित जमाती (एसटी) - ०६ (पैकी तीन महिला)

आजपासून हरकती नोंदविता येणार

दरम्यान, या आरक्षण सोडतीतील त्रुटी दूर करता याव्यात, यासाठी येत्या शुक्रवारपासून (ता.२९) २ आॅगस्टपर्यंत याबाबत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. या हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा परिषद निवडणूक विभागात नोंदवाव्या लागणार आहेत. या मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत. त्यानंतर हे आरक्षण अंतिम केले जाणार आहे. अंतिम केलेले आरक्षण हे येत्या ५ आॅगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आरक्षण सोडतीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.