German Bakery Blast: जर्मन बेकरी अकरा वर्षांनंतर...: स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात

riyaz-bhatkal-iqbal-bhatkal
riyaz-bhatkal-iqbal-bhatkal
Updated on

पुणे - तब्बल अकरा वर्षे झाले तरी, कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीतील स्फोटाचा तपास अजून सुरूच आहे. कारण, या स्फोटातील प्रमुख संशयितांनी त्यांचे बस्तान पाकिस्तानात बसविल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे. दरम्यानच्या काळात दहशतवादाचा चेहरा बदलत असून, आता सायबर हल्ला हा दहशतवादाचा नवा चेहरा आहे. पुण्यासारख्या शहराला तर, या नव्या चेहऱ्यापासून अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, कारण दहशतवादी गटांशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या काही संघटना पुण्यात पोचल्या आहेत. 

१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी जर्मन बेकरीत स्फोट झाला. त्यात १८ नागरिकांचा मृत्यू झाला अन ६० जण जखमी झाले.  पाठोपाठ दोन वर्षांनीच १ ऑगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर पाच ठिकाणी बॉम्ब स्फोट घडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात एक जिवंत बॉम्बही हस्तगत करण्यात आला. तत्पूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही स्फोट घडविण्याचा प्रयत्न सतर्क फुलविक्रेत्यामुळे अयशस्वी ठरला होता. पुण्यातील ओशो आश्रम, छबाड हाऊस, लाल देऊळ ही ठिकाणेही दहशतवाद्यांच्या ‘रडार’वर असल्याचे उघड झाले होते. 

आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडलीने २००८ मध्ये पुण्यात दोन दिवस कोरेगाव पार्कमध्ये वास्तव्य केल्याचे त्यावेळी उघड झाले. पुढे या हेडलीचा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातही हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जर्मन बेकरीमध्ये स्फोट होण्यापूर्वी सुमारे दोन-चार वर्षे ‘लष्करे तोयबा’ या दहशतवादी गटाशी जवळीक असलेला ‘इंडियन मुजाहिदीन’ हा दहशतवादी गट पुण्यात सक्रिय होता. 

पूर्व भागातील एका शिक्षण संस्थेत त्यांच्या काहीकाळ नियमित बैठकाही होत असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले. मुंबईच्या गुन्हे शाखेने कोंढव्यातील ‘अशोका म्यूज’ या सोसायटीतून १२ संशयितांना अटक केली, तेव्हा इंडियन मुजाहिदीन शहरात सक्रिय असल्याचे अधोरेखित  झाले होते. 

पुण्यात यंत्रणांचा वावर वाढला 
मुंबई पोलिसांनी २००८ मध्ये कोंढव्यातून इंडियन मुजाहिदीनचे १२ संशयित अटक केले अन पुणे एकदम राष्ट्रीय नकाशावर झळकले. त्यामुळे पुण्यात ‘एटीएस’च्या पथकात वाढ करण्यात आली. तसेच राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), केंद्रीय गुप्तचर विभाग (आयबी), राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) यांच्याही पुण्यातील पथकांत वाढ झाली. ‘एनआयए’चेही पुण्यात कार्यालय स्थापन झाले आहे. दरम्यानच्या काळात मुंबई, दिल्ली, बंगळूर, लखनौ, बिहार आदी राज्याच्या एटीएस पथकांचाही शहरातील वावर वाढला आहे.

तपास कसा सुरू आहे 
जर्मन बेकरीच्या स्फोटाचा तपास अजूनही सुरू आहे. बेगचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे तर, यासिनच्या खटल्याची सुनावणी मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र रियाज, इक्बाल, मोहसीन आणि जबीउद्दिन हे फरार असले तरी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (आयबी) आदी तपास यंत्रणा शांत बसलेल्या नाहीत. चारही आरोपींसाठी ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली असून त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलचीही मदत घेण्यात येत आहे. तसेच फरारी आरोपींशी संबंधितांवरही नजर असल्याचे तपास यंत्रणांमधील काही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

काही गटांवर लक्ष 
वादग्रस्त ठरलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केरळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सिमीवरही बंदी आहे. ‘पीएफआय’चे मुख्यालय यापूर्वी औरंगाबादला होते. परंतु, त्यांनी ते नुकतेच पुण्यात कोंढव्यात स्थलांतरीत केले आहे. सांस्कृतिक, वैचारिक भूमिका घेऊन काम करणाऱ्या या संघटनेत मधल्या काळात काही कडव्या विचारांच्या युवकांचा समावेश झाला होता. त्यामुळे पोलिसांचे त्यांच्यावर लक्ष आहे. तसेच दहशतवादाशी संबंधित काही गटही अधून-मधून त्यांचे पुण्यातील अस्तित्व दाखवून देतात, अशी माहिती पोलिसांची माहिती आहे.

यासीन भटकळ तिहार जेलमध्ये
जर्मन बेकरीतील स्फोट प्रकरणाचा सूत्रधार यासीन भटकळ, त्याचा साथीदार मिर्झा हिमायत बेग, तसेच ‘दरभंगा मोड्यूल’मधील कतिल सिद्दीकी यांना तपास यंत्रणांनी अटक केली. देशात आठपेक्षा अधिक स्फोटांचा सूत्रधार असलेला यासीन सध्या तिहार जेलमध्ये आहे, तर बेगला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती आणि शिक्षा कमी करण्यासाठी त्याने केलेली याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सिद्दिकीचा ८ जून २०१२ मध्ये येरवडा कारागृहात खून झाला. मात्र, ‘इंडियन मुजाहिदीन’ निर्माण करणारा रियाज भटकळ, त्याचा भाऊ इक्बाल भटकळ आणि त्यांचा पुण्यातील साथीदार मोहसीन चौधरी आणि बीडचा जबीउद्दिन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल हे अद्याप फरार आहे. हे चौघेही पाकिस्तानात असल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे. मोहसीन पाकिस्तानात अली नावाने राहतो, असे बाटला हाऊस प्रकरणातील संशयित महंमद सलमानने दिल्ली पोलिसांना सांगितले आहे. 

रिक्षाने बॉम्ब पोचला जर्मन बेकरीत 
जर्मन बेकरीत स्फोट घडविण्यापूर्वी सूत्रधार यासीन भटकळ पुण्यातील कात्रज भागात राहायला होता. एका खोलीत त्याने बॉम्ब तयार केला. तेथून तो रिक्षाने स्वारगेटला पोचला. तेथून त्याने तो बॉम्ब दुसऱ्या रिक्षाने जर्मन बेकरीपर्यंत नेला. तेथे बेगकडे दिल्याचे सांगितले जाते. कात्रज-स्वारगेट रिक्षा प्रवासात यासीन बॉम्ब काळजीपूर्वक घेऊन जात होता. त्यामुळे रिक्षातील सहप्रवाशाने त्याला विचारलेही होते, ‘अरे भाई, ये क्या है, इसमे बॉम्ब तो नही,’ हे ऐकताच यासीन चरकला होता. पकडला गेल्यावर त्यानेच ही माहिती पोलिसांना  तपासादरम्यान दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.