पुणे - इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या नियमित फेरीत ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली आहेत. यात जवळपास निम्म्याहून अधिक म्हणजे ५६.१५ टक्के विद्यार्थ्यांची पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड झाली आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (१ जुलै) महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण एक लाख २० हजार २६५ जागा आहेत. प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत ६६ हजार ९३४ विद्यार्थी असून त्यापैकी ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे.
त्यातील २१ हजार ८४० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. कला शाखेत तीन हजार ६४० विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेत १४ हजार २११ विद्यार्थ्यांना, तर विज्ञान शाखेत २० हजार ६०४ विद्यार्थ्यांना आणि व्यवसाय शिक्षण शाखेत ४३५ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे.
महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तसेच प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
पहिल्या फेरीच्या निवड यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास, महाविद्यालयाकडून प्रवेश नाकारल्या अथवा घेतलेला प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
हमीपत्राद्वारे प्रवेश देण्याचा आदेश
अकरावीच्या प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थी गेल्यास आणि त्यांच्याकडे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यास, अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात येऊ नयेत. अशा विद्यार्थ्यांना हमीपत्राद्वारे प्रवेश देण्यात यावेत, अशी सूचना सहाय्यक शिक्षण संचालक आणि इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे.
याद्या जाहीर करण्याची घाई
इयत्ता अकरावीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या नियमित फेरीची निवड यादी गुरुवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने बुधवारी (ता. २६) रात्री उशिराच निवड यादी जाहीर केली. त्यामुळे, विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘विद्यार्थी लॉगिन’मध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय आणि महाविद्यालयांना त्यांच्या ‘कॉलेज लॉगिन’मध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी सकाळपासूनच (सकाळी दहापूर्वी) दिसल्याचे निदर्शनास आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.