पुणे ः महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायदा हा राष्ट्रीय पातळीवर लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचंगरीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आल्याचे ‘अंनिस’ने स्पष्ट केले आहे.
हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत सुमारे ११६ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शिवाय शेकडो लोक अजून उपचार घेत आहेत. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना ‘अंनिस’मार्फत श्रद्धांजली वाहण्यात आली. पूर्वी पोलिस कर्मचारी असलेल्या आणि पुढे स्वतः ला बाबा नारायण हरी म्हणवून घेणाऱ्या या बाबाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या प्रकऱणाची चौकशी कऱण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन करावी, अशीही मागणी ‘अंनिस’ने केली आहे.
हा स्वयंघोषित बाबा स्वतः देवाचा अवतार असल्याचे जाहीररित्या सांगत असून, त्यातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने भक्त गोळा केले आहेत. महाराष्ट्रात ‘अंनिस’च्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्याद्वारे लोकांना फसविणे हा गुन्हा आहे. अशाच पद्घतीचा कायदा देशभर लागू केला पाहिजे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांना आळा बसू शकेल, असे ‘अंनिस’ने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, आज राज्यसभेत खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे. सभापती जगदीप धनकड यांनीसुद्धा जादूटोणा विरोधी कायद्याविषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि याबाबत सदनाला माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे. त्यांची ही सूचना स्वागतार्ह आहे.
‘राज्यातील खासदारांना कायद्याची प्रत देणार’
दरम्यान, यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रत देण्यात येणार आहे. अशाच पद्धतीचा कायदा संसदेत मांडण्याची विनंती सर्व खासदारांना ही प्रत देताना केली जाणार आहे. हज, अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होतात. लोकांनीदेखील श्रध्दा बाळगताना आपले आयुष्य आणि आरोग्याची घेण्याचे आवाहन ‘अंनिस’च्यावतीने मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोळकर, राहुल थोरात, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे आदींनी केले आहे.