पुणे : राज्यातील अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१५-१६च्या तुलनेत २६.३१ टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अधिकृत आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. २०१५ मध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या एक लाख ४६ हजारांवर पोचली होती. बोगस शैक्षणिक संस्था बंद पडणे, उद्योगांची गरज बदलणे आणि कोरोनामुळे बदललेल्या आर्थिक गणितांचा परिणाम अभियांत्रिकीच्या प्रवेशांवर झाला आहे. २०१३ ते १०१६ दरम्यान राज्यात अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची दोन लाखांपेक्षाही अधिक होती. २०१८ नंतर त्यात कमालीची घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे (सीओईपी) प्रा. डॉ. जयंत करजगीकर म्हणतात, ‘‘दरम्यानच्या काळात अभियांत्रिकी महाविद्यालयांबरोबच विद्यार्थी संख्येलाही फुगवटा आला होता. कोरोना काळात बिघडलेली आर्थिक गणिते, तसेच उशिरा होणाऱ्या प्रवेश प्रक्रियांचा परिणामही प्रत्यक्ष प्रवेश कमी होण्यास कारणीभूत ठरले आहे. सीओईपीसारख्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आजही प्रवेशासाठी चढाओढ लागलेली आहे.’’ कोरोना साथीच्या आधीपासूनच अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळत होते.
दर्जाहीन शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था कोरोनाकाळात जवळपास बंद पडल्या. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी झाल्या. पर्यायाने अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल काहीसा कमी झाल्याचे निरीक्षण एमआयटी कोथरूडचे प्रा. डॉ. गणेश काकंडीकर यांनी नोंदविले. ते म्हणाले, ‘‘एक प्रकारची सूज आता ओसरली असून, पूर्णपणे विचार करूनच विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेत आहे. उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि रोजगारक्षम शिक्षण देणाऱ्या अद्ययावत शैक्षणिक संस्थांमध्येच येत्या काळात प्रवेश वाढणार आहे. जे दर्जेदार आहे. तेच टिकणार.’’
निश्चितच मागील काही वर्षांत अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. भरमसाट शुल्क भरूनही रोजगाराची शाश्वती नसल्यामुळे ही संख्या घटली आहे. अभियांत्रिकीच्या पारंपरिक शाखांच्या तुलनेत, डाटा सायन्स, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी नव्या शाखांमध्ये प्रवेशसंख्या वाढली आहे.
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.