पुणे - मेट्रो धावल्यामुळे पुणे शहर आता खऱ्या अर्थाने ‘मेट्रो सिटी’ झाले आहे. मात्र, अजूनही नजीकच्या प्रवासासाठी (लास्ट माईल कनेक्टीव्हीटी) आवश्यक सुविधांचा अभाव असून, इ-सायकलींपासून दुचाकींपर्यंतचे सर्व सार्वजनिक पर्याय अपयशी ठरले आहे. पुणेकरांची हीच गरज ओळखून पुणेरी पठ्ठ्यांनी वैयक्तीक वापराची ‘इलेक्ट्रीक किक स्कूटर’ बाजारात आणली आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारे अनिरुद्ध गुंजाळ आणि अजय मोरे, तसेच हर्षित अग्रवाल या युवकांनी एकत्र येत ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
अनिरुद्ध सांगतो, ‘पदव्युत्तर शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये असताना दोन ते तीन किलोमीटर जाण्यासाठी किक स्कूटरचा वापर केला जायचा. कारण तिथे दुचाकीचा वापर नसल्यात जमा आहे. तसेच टॅक्सीसुद्धा परवडणारी नव्हती.
पुणे शहराची सुद्धा ही गरज असून, इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणाऱ्या किक स्कूटरची आम्ही निर्मिती केली आहे. जी सहजपणे दुमडून सोबत नेता येते. मेट्रोतील प्रवासाबरोबरच नजीकच्या अंतरासाठी ही स्कूटर प्रभावी ठरणार आहे.’’ सप्टेंबर २०२१ मध्ये या स्कूटरचे प्राथमिक नमुना विकसित करण्यात आला होता.
त्यातून जेनेसिस इलेक्ट्रीक या नावाने स्टार्टअप सुरू करण्यात आले असून, आजवर पुणे, मुंबई, बंगळूर आदी ठिकाणी या स्कूटरची विक्रीही करण्यात आली आहे. इंधनाच्या बचतीबरोबरच पर्यावरण पूरक आणि किफायतशीर असलेला हा पर्याय उद्याच्या मेट्रोसिटीचे वैशिष्ट्ये ठरणार आहे.
जवळच्या मेट्रो स्थानकावर पोचण्यापासून ते गर्दीच्या रस्त्यांवर खरेदीपर्यंत, नजीकच्या अंतरावरील प्रवासासाठी या ई-किक स्कूटरचा फायदा होईल. उत्पादनाची सर्व कामे पुण्यातच केली असून, बांधणीसाठीची सर्व यंत्रणा आमच्याकडे आहे. पुणे शहरातील रस्त्यांवर, उड्डाणपुलावर आणि नागरिकांकडूनही याची चाचणी केली आहे.
- अनिरुद्ध गुंजाळ, नवउद्योजक
प्रमुख फायदे
कमी वजन आणि दुमडत असल्यामुळे सहज कोठेही घेऊन जाता येते
चार्जिंगमुळे एका किलोमीटरसाठी फक्त २० पैसे खर्च
जवळच्या अंतरावरील, तसेच गर्दीच्या रस्त्यांवर सहज प्रवास शक्य
मेट्रो स्थानकापर्यंत किंवा तेथून कामाच्या ठिकाणी सहज वापरता येईल
वैशिष्ट्ये
१२ किलो वजन
८० सेंटिमीटर लांब आणि १५ सेंटिमीटर रुंद
उंची गरजेनुसार बदलता येते
बॅटरी अडीच ते तीन तासांत चार्ज होते
एकदा चार्ज केल्यावर ३० किलोमीटर धावते
जास्तीत जास्त २५ किमीचा वेग
मोबाईल चार्जिंग आणि होल्डर उपलब्ध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.