पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२० मधील ८०० अपात्र परिक्षार्थींकडून एजंटमार्फेत पैसे घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे (Maharashtra State Examination Council) आयुक्त तुकाराम सुपे याच्या कार्यालयातील संगणकावरच आरोपींनी मार्क वाढवले. त्यानंतर अपात्र परीक्षार्थींना पात्र ठरवत निकालाची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्याची बाब पोलिस तपासात उघडकीस आली आहे.
सुपे यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक सुनील घोलप याने त्यांच्याकडे आलेल्या परीक्षार्थींची नावे व हॉलतिकीटची माहिती त्याच्या मोबाईल व्हाटसअपवरुन परीक्षा घेणाऱ्या जी.ए.टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुखच्या व्हॉटसअपवर पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. देशमुख याने गैरव्यवहारातून प्राप्त केलेल्या रकमेतून वर्धा येथे शेतजमीन तसेच चारचाकी वाहन खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या व्यवहाराबाबत तसेच इतर आर्थिक व्यवहाराचे अनुषंगाने पोलिसांना तपास करावयाचा आहे.
देशमुख याने त्याचे एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्या माध्यमातून बुलढाणा, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, पुणे, मुंबई येथील वेगवेगळे एजंट, क्लासचालक यांच्याशी संपर्क साधत पेपरफुटी केल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्था चालकांमार्फेत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना परीक्षेपूर्वी पेपर देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम स्वीकारण्यात आल्या असून त्यातील काही हिस्सा शासकीय अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाली आहे.
आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ :
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डॉ. प्रीतिश देशमुख, संतोष हरकळ, अंकुश हरकळ, अंकित चनखोरे, कृष्णा जाधव, अजय चव्हाण यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. डोलारे यांच्या न्यायालयाने आरोपींना सहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोग्य भरती गट ‘क’ परिक्षेतील अमरावती येथून अटक करण्यात आलेले आरोपी निशाद गायकवाड, राहुल लिंघोटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत सहा जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. दिल्लीतील एजंट अशुतोष शर्मा याच्या मदतीने त्यांनी १५ ते १८ उमेदवारांना व एजंटना परीक्षेचा पेपर पुरविल्याची बाब उघडकीस आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.