Pune News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला धक्का बसला. मात्र, या निर्णयामुळे डगमगून न जाता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्या जोमाने मतदारांना सामोरे जाण्याचा निर्धार शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातून १० आमदार निवडून आले होते. त्यातील अशोक पवार वगळता उर्वरित नऊ आमदार अजित पवार गटासमवेत गेले आहेत. तर, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील,
डॉ. अमोल कोल्हे, महंमद फैजल (लक्षद्विप), ॲड. वंदना चव्हाण, फौजिया खान हे शरद पवारांसमवेत आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटात आहेत. शहरातील ५२ पैकी ४२ माजी नगरसेवकही अजित पवार गटात गेले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानाच्या मुद्द्यावर केली असून तोच स्वाभिमान कायम ठेवून पक्ष न्यायालयीन लढ्याला सामोरा जाईल. सर्वोच्च न्यायालयात याबाबत न्याय मिळेल, असा विश्वास आहे. आमची राजकीय जडण-घडण ‘पवारसाहेब’ या एकाच नावाभोवती झाली असून तोच आमचा विचार आहे. पवारसाहेब हाच आमचा पक्ष आणि पवारसाहेब हेच आमचे चिन्ह आहे.
- अशोक पवार, आमदार, शिरूर, (शरद पवार गट)
निवडणूक आयोगाने निर्णय दिला तो अपेक्षित होता, कारण शिवसेनेच्या संदर्भात निवडणूक आयोगाने प्रथम दोन्ही पक्षाला वेगवेगळी चिन्ह दिली होती, परंतु त्यानंतर दिल्लीमधून सूत्र हलवली गेली आणि दबावाखाली निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता आणि चिन्ह दिले. त्याच वेळेला आम्हालाही लक्षात आलं की आमच्याही बाबतीमध्ये अशाच प्रकारचा दबावाचा राजकारण केले जाईल आणि त्याची प्रचिती आज आम्हाला आली.
- अंकुश काकडे, राज्य प्रवक्ता, (शरद पवार गट)
केंद्राच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा हा निर्णय अपेक्षितच होता. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, त्याचे हे एक उदाहरण आहे. नवे चिन्ह आणि पक्षाचे नवे नाव घेऊन आमच्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत आणि त्यात नक्की यशस्वी होऊ, अशी आम्हाला खात्री आहे.
- ॲड. वंदना चव्हाण, खासदार, (शरद पवार गट)
मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह आंदण देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक असून देशातील हुकूमशाही कोणत्या स्तराला गेली आहे याचं हे समर्पक उदाहरण आहे. अस्तित्वाचा हा लढा आम्ही न्यायालयीन मार्गाने तर लढूच, परंतु देशातील सर्वांत मोठे न्यायालय असलेल्या जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही आता न्याय मागू.
- प्रशांत जगताप, पुणे शहराध्यक्ष, (शरद पवार गट)
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष व त्यांचे चिन्ह दिलेले आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल, नियम व संविधानाप्रमाणे देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे, त्यांच्याबाजुने हा निकाल आहे. अजित पवार हे नक्कीच राष्ट्रवादी पक्ष वाढवतील. निकालाबाबत विरोधकांकडून निवडणूक आयोगावर होणारी टीका अयोग्य आहे. कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतो. त्यामुळे आयोगाचा निकाल सर्वांनी स्वीकारला पाहिजे.
- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
निवडणूक आयोगाने सर्व सुनावणी तावून-सुलाखून घेतली आणि त्यानंतरच निर्णय दिला आहे. त्यावरून अखेर सत्याचा विजय होतो, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९८ टक्के पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या पाठिशी होते. त्याचीही दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने होईल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या ते आकांक्षांची पूर्ती करतील.
- दीपक मानकर, पुणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. त्यांनी मांडलेली बाजू योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचा निर्णय राज्याला पुढे घेऊन जाणार आहे. यातून अजित पवार यांचे नेतृत्व घडणार आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे राज्यातील जनता निश्चितपणे उभी राहील असा विश्वास आहे.
- प्रदीप गारटकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस
जेव्हा २ मे २०२३ रोजी आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा, ‘तो निर्णय योग्य असून, अजितदादा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे द्यावीत. ते ती सांभाळण्यासाठी अतिशय सक्षम आहेत,’ अशी प्रतिक्रिया देणारा मी पहिला आमदार होतो. सुदैवाने माझे ते भाकीत खरे ठरले. त्यामुळे आजच्या निर्णयाचा मला सर्वाधिक आनंद आहे. माझ्या जीवनातील हा अतिशय आनंदाचा क्षण आहे.
- दिलीप मोहिते, आमदार, खेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.