ओझर (पुणे) : शिरोली बुद्रूक (ता. जुन्नर) परिसरातील गावांत प्रदूषणातून पडणाऱ्या काजळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
शिरोली परिसरात मुख्यत्वे ऊस, कांदा, भाजीपाला, फळ व फूल पिके घेतली जातात. सध्या सर्वच भाजीपाल्याला बाजारात भरपूर मागणी असून भावही चांगला आहे. परंतु, हवेतून येणारी काजळी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
या परिसरात श्री विघ्नहर साखर कारखान्याव्यतीरिक्त दुसरा कोणताही मोठा औद्योगीक व्यवसाय नाही. कारखान्यापासून आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात हवेच्या माध्यमातून आलेली काजळी शेतातील पिकावर पडून दवबिंदूमुळे घट्ट चिटकून राहते व ती काही केल्या पडत नाही. मुख्यत्वे फ्लॉवर, शेवंती यासारख्या पांढऱ्या रंगाच्या पिकांवर काजळी पडल्यामुळे प्रत खालावते. बाधित माल विकत घेण्यास व्यापारी धजावत नाही. परिणामी चढ्या बाजारातही मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागतो. आढी वस्ती येथे असलेल्या अमोल थोरवे यांच्या फ्लॉवर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांना फोनवरून व पत्राद्वारे कळविले आहे. तसेच, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. काजळीचे प्रदूषण होऊ नये म्हणून विघ्नहर कारखान्याने यंत्रणा बसविली आहे. याबाबत खात्री करून संपर्क करणार असल्याचे जंगले यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट व कारखान्याच्या शेतकी विभागाचे प्रतिनिधी प्रमोद नायकोडी व स्वप्नील नायकोडी यांनी बाधित पिकाची पाहणी केली.
वेळीच बंदोबस्त करावा
काजळीमुळे झाडाच्या पानांची पर्नरंध्र बंद होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळे पिकाची वाढ नीटशी होत नाही. त्याचा परिणाम एकूण उत्पादनावर होतो. तसेच, पांढऱ्या मालाच्या दर्जावर त्याचा जास्त परिणाम होतो. या काजळीचा परिसरातील नागरिकांच्या, जनावरांच्या व इतर सजिवांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.