Pune: कासार आंबोली (ता. मुळशी) येथील पुणे-कोलाड रस्त्यावर शिंदेवाडी येथील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ झाली असून, जखमींचे प्रमाणही वाढले आहे. हा खड्डा व लगतचा चर बांधकाम विभागाने तातडीने बुजवावा, अशी मागणी सरपंच सुवर्णा मारणे यांनी केली आहे.
पुणे-कोलाड या महामार्गावरून कोकणाकडे जाताना शिंदेवाडी येथील पुलालगतच हा खड्डा आहे. सुमारे चार ते पाच फूट लांबीच्या या खड्ड्याशेजारीच सिमेंटच्या रस्त्याचा उंबरा असून, तेथेही खड्डा आहे. या खड्ड्यांतून वाहने जाताना वारंवार आदळतात आणि अपघात होतात. दुचाकी वाहने वारंवार धडकून पडल्याने अपघात होऊन चालक जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. मोपेड दुचाकी या खड्ड्यांत थेट अडकून पडत आहेत.