दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जांभूळवाडी तलाव परिसरात आज (शुक्रवार) सकाळी तीन ते चार टन मृत मासे काठावर तरंगत असल्याचे दिसून आले.
आंबेगाव - दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जांभूळवाडी तलाव परिसरात आज (शुक्रवार) सकाळी तीन ते चार टन मृत मासे काठावर तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेने तलावाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले. तर मृत माशांच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तलाव परिसरात वाढलेल्या मानववस्तीतील ड्रेनेजचे पाणी दिवसाढवळ्या तलावात सोडले जाते आहे. त्यावर पाटबंधारे विभाग आणि महापालिकेची उदासीनता दिसून येते आहे. दूषित पाणी तलावात गेल्याने पाण्यावर तेलकट तवंग दिसून येतो आहे.शिवाय पाण्याचा दुर्गंधीयुक्त वासही येतो आहे.
नव्याने महापालिकेत सामाविष्ट झालेला जांभूळवाडी तलाव नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. दरम्यान तलावाचे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पाटबंधारे विभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवता. पालिका आणि पाटबंधारे विभागाच्या या धोरणाने तलाव मात्र दुर्लक्षित राहिल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. गतवर्षी ही तलावात अशीच मासे मरण्याची घटना घडली होती. त्यानंतर आज या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
तलावातील मच्छीमार मासेमारी करण्यासाठी भुलीचे औषध किंवा पावडर पाण्यात टाकतात.त्यामुळे मासे पाण्यावर तरंगतात आणि ते मासे विकण्यासाठी आणतात. त्या टाकल्या जाणाऱ्या औषधाने मासे मेल्याची माहिती स्थानिकांनी 'सकाळ'ला दिली. असे असताना मात्र तलावातील मृत मासे घेऊन जाण्यासाठी स्थलांतरित कामगारांनी तलावावर गर्दी केली होती. तलावाचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी अपेक्षाही स्थानिकांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली.
तलावाचे हस्तांतरण केव्हा?
वारंवार तलावात मासे मरत आहेत.शिवाय तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. तलावाभोवती असलेल्या मोठ्या सोसायट्यांमधील मैलामिश्रित सांडपाणी तलावात दिवसाढवळ्या सोडलेले आहे. तलावाच्या पाण्याचा वास येतो आहे. असे असताना तलावाचे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरण कधी होणार? असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत.
प्रतिक्रिया -
तलावात येणारे सांडपाणी पूर्णपणे बंद होण्यासाठी स्थानिक आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून ड्रेनेज (ट्रंक) लाइन टाकण्यात आली आहे. त्याच्या ब्रांच लाईन टाकल्यानंतर सांडपाणी पूर्णपणे बंद होईल. जेणेकरून तलावातील जैवविविधतेला धोका होणार नाही. तत्पूर्वी प्रशासनाने तलावाकडे लक्ष द्यायला हवे.
- पल्लवी जगताप,स्थानिक आंबेगाव खुर्द
परिसरातील दूषित पाणी तलावात येत असल्याने मासे मृत झाले असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरील घटनेची पूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.