दौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातमधील एका सहायक फौजदारासह एकूण आठ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर शनिवारी (ता. 2) पाच पोलिस संशयित रुग्ण म्हणून आढळले आहेत. या पाच जणांना शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबई येथे बंदोबस्त करून दौंड येथे परतलेल्या "एसआरपीएफ'च्या 110 जवानांच्या तुकडीतील एकूण 8 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. दरम्यान, शनिवारी मुंबई येथून परतलेल्या तुकडीतील अन्य 102 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी पाच जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले होते. त्यांचे स्वॅब सॅम्पल पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. 102 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कॅंपातील एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आले असून, त्यांचा क्वारंटाइन कालावधी वाढविण्यात आला आहे.
दौंड शहरातील "एसआरपीएफ'मध्ये आठ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शहर व शहराला लागून असलेली गावे प्रांताधिकारी यांच्या आदेशाने सील करण्यात आली आहे. शहर व परिसरात बॅंका आणि औषध दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती.
विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दौंड शहर, लिंगाळी, गोपाळवाडी ग्रामपंचायत व तीन किलोमीटर परिघातील वाड्या व वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. तसेच, एसआरपीएफ गट क्रमांक सात केंद्रस्थानी धरून पुढील पाच किलोमीटरचा परिसर हा बफर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
लिंगाळी, गोपाळवाडी, भवानीनगर व भोंगळे मळा, पवार वस्ती व दळवी मळा या भागातील कुटुंबांचे आरोग्य सेवकांच्या साह्याने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यात लक्षणे असलेली एकही व्यक्ती आढळून आली नाही, अशी माहिती गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी दिली. उपअधीक्षक एैश्वर्या शर्मा, निरीक्षक सुनील महाडीक यांनी शहराच्या प्रवेशमार्गांवरील नाकाबंदी कडक केली असून, गावांमधील काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.