पुणे - पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळून ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या सातपैकी पाच रुग्ण दहा दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. या सर्व रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून परत घरी सोडण्यात आले आहे. शिवाय या व्हेरियंटमुळे रुग्णांना फारसा त्रासही होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुणेकरांनी ओमीक्रॉनबाबत घाबरू नये. परंतु प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करत काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१०) पुणेकरांना केले आहे.
ओमीक्रॉनची लागण झालेल्यांपैकी बऱ्या झालेल्या पाच रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. बऱ्या झालेल्यांमध्ये पुण्यातील एक आणि पिंपरी-चिंचवडमधील चार रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित दोन्ही रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमधील असून, सध्या ते चांगले आहेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये ५ डिसेंबर २०२१ रोजी एकाच दिवशी ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या सात रुग्णांची नोंद झाली होती. पुणे शहरात फिनलंडवरून आलेल्या व्यक्तीची ओमीक्रॉनची चाचणी पहिल्यांदा निगेटिव्ह आली होती. मात्र त्यानंतर त्याला ताप आल्यानंतर त्या व्यक्तीची पुन्हा चाचणी घेतली असता, त्याला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे निदान झाले होते. आता त्याची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील सहा जणांना ओमीक्रॉनची लागण झाली होती. यापैकी चार जण निगेटिव्ह झाले आहेत. यामध्ये एक ४४ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष आणि सात व दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. अन्य दोन मुलींचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय व एका १८ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
सध्या राज्यात फक्त चार रुग्ण
दरम्यान, सद्यःस्थितीत राज्यात ओमीक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले केवळ चार रुग्ण शिल्लक राहिले आहेत. राज्यात दहा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या होत्या. त्यामुळे डोंबिवलीतील एक युवक आणि पुणे व पिंपरीतील पाच जण असे एकूण सहा जण ओमीक्रॉनमुक्त झाले आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या मुंबईतील दोन आणि पिंपरीतील 2 असे चार रुग्ण शिल्लक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.