अन्न व औषध प्रशासनाचे खाद्यपदार्थांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष

वडापाव, सामोसे, ब्रेड पॅटिस, गरम-गरम भजी असे चमचमीत पदार्थ सुरक्षित करण्यासाठी प्रथमच राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पाऊल टाकले आहे.
Watch on food and Edible Oil
Watch on food and Edible OilSakal
Updated on
Summary

वडापाव, सामोसे, ब्रेड पॅटिस, गरम-गरम भजी असे चमचमीत पदार्थ सुरक्षित करण्यासाठी प्रथमच राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पाऊल टाकले आहे.

पुणे - वडापाव, सामोसे, ब्रेड पॅटिस, गरम-गरम भजी असे चमचमीत पदार्थ सुरक्षित करण्यासाठी प्रथमच राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पाऊल टाकले आहे. आता वारंवार उकळलेल्या तेलात खाद्यपदार्थ तळता येणार नाहीत. ‘टोटल पोलर कंपाउंडस्’च्या (टीपीसी) माध्यमातून तळल्या जाणाऱ्या पदार्थांच्या तेलाचा दर्जा तपासण्याची यंत्रणा उभारली आहे.

एकाच तेलात सातत्याने खाद्यपदार्थ तळल्याने ते तेल काळे होते, त्याला वास येऊ लागतो. त्यातून धूरदेखील येत असतो. अशा काळ्या झालेल्या तेलातील खाद्यपदार्थांचा दुष्परिणाम थेट मानवी आरोग्यावर होतो.

पथदर्शी प्रकल्प

‘टीपीसी’ तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प शहरात ‘एफडीए’तर्फे राबविला. त्याअंतर्गत १२९ ठिकाणी आतापर्यंत तपासणी केली. त्यापैकी दोन विक्रेत्यांकडील तेलाचा ‘टीपीसी’ २५पेक्षा जास्त होता.

कायदा काय?

  • ‘अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६’ची काटेकोर अंमलबजावणी ‘एफडीए’तर्फे करण्यात येत आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार एक तेल केवळ तीन वेळा वापरण्यास विक्रेत्यांना परवानगी दिली आहे.

  • उकळलेल्या तेलात नवीन तेल ओतून ‘टॉपअप’ करण्यास मान्यता.

मानवी आरोग्यास धोकादायक काळ्या तेलाचा वापर रोखण्यासाठी त्याच्या तपासणीचे पाऊल उचलले आहे. याची प्रभावी अंमलबजावणी पालखी सोहळ्यात करण्यात येईल, त्यामुळे पालखी मार्गावरील अन्नसुरक्षा वाढेल. काळे तेल संकलित करण्याची व्यवस्थाही उभारली आहे.

- शिवाजी देसाई, सहआयुक्त (अन्न), एफडीए, पुणे विभाग

वडापाव हा आवडता पदार्थ आहे. पण, त्यातले तेल कधीचे, कसे असेल असे प्रश्न मनात आल्याने तो खाण्यापेक्षा न खाण्याकडेच कल अधिक होतो. ‘एफडीए’च्या या उपक्रमामुळे तीनपेक्षा जास्त वेळा तळलेल्या तेलात वडा मिळणार नाही, अशी खात्री वाटते.

- अश्विनी पाठक

विठ्ठलभक्तीसाठी...

आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥

हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें।।

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वाटेवर एकाग्रचित्तानं पावलं टाकणाऱ्या लाखो भक्तांना मार्ग आरोग्यसंपन्न राखणं हीदेखील एकप्रकारची विठ्ठलभक्तीच. स्वच्छ रस्ते, सकस अन्न वारकऱ्यांना उपलब्ध करून देणं ही विठ्ठलसेवाच.सरकारचा बडगा असो किंवा नसो, आपली संस्कृती म्हणून वारीच्या आरोग्याची काळजी आपण वाहिली पाहिजे. स्वच्छता राखण्याची, सकस अन्नपुरवठ्याची जबाबदारी आपणही समाज म्हणून घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटते? काय उपाय सुचवाल तुम्ही?याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

‘टोटल पोलर कंपाउंडस्’ म्हणजे काय?

एकाच तेलात सतत खाद्यपदार्थ तळल्याने पेरॉक्साईड आणि हायड्रोपेरॉक्साईड तयार होतात. त्यात ‘शॉर्ट चेन फॅटी ॲसिड’, ‘किटोन्स’ अशा उत्पादकांचाही समावेश असतो.

कोणते दुष्परिणाम होतात?

  • काळ्या तेलात तळलेल्या खाद्यपदार्थांमुळे फॅटी लिव्हर होते, त्यातून स्थूलता वाढते.

  • मेदामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होतात.

  • मूत्रपिंडाच्या (किडनी) कार्यक्षमतेवरही त्याचा दूरगामी परिणाम होतो.

  • अॅसिडीटी, हगवण होते.

...असे तपासणार काळे तेल

  • अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने काळे तेल तपासण्यासाठी १७ ‘टीपीसी’ उपकरणे घेतली आहेत. हे तपासण्याची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यापासून होणार आहे.

  • खाद्यपदार्थ तळणाऱ्या गाड्यावर, तसेच दुकानात जाऊन तेथील तेलात हे उपकरण अर्ध्या मिनिटासाठी बुडविले जाईल. त्यानंतर त्या उपकरणावर २५ युनिटपेक्षा जास्त आकडा असेल, तर ते तेल नष्ट केले जाईल.

  • त्यासाठी तेलाचे तापमान ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

  • डब्यातून काढलेल्या तेलाचा ‘टीपीसी’ १५ युनिटपेक्षा जास्त नसावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.