पुणे - संशोधनाभिमुख आणि रोजगारक्षम अशा नव्या कोऱ्या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची (New Courses) सुरवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) वतीने करण्यात येत आहे. राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या अभ्यासक्रमांचा प्रस्ताव विद्या परिषदेने मंजूर केला असून, आता तो व्यवस्थापन परिषदेच्या पुढे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
राज्यामध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची मांडणी करणारे विद्यापीठ ही पहिलीच शैक्षणिक संस्था आहे. नवीन शैक्षणिक धोरणात चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचे प्रावधान असून, त्याच्या शेवटच्या वर्षाला संशोधन आणि प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाला प्राधान्य दिले आहे. विद्यापीठानेही कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमांची रचना केली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या संकुलात आणि उपकेंद्रांवर हे अभ्यासक्रम सुरू होतील, त्यानंतर महाविद्यालयांमध्ये याची सुरवात होईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली आहे.
असे आहेत अभ्यासक्रम
1) बॅचलर इन आर्ट्स (बीए) अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र
2) बॅचलर इन कॉमर्स (बी.कॉम.) आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय वित्त
3) बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.) विपणन आणि वित्त
4) बॅचलर ऑफ सायन्स (बीएस्सी) डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान
विद्यार्थ्यांसाठी नवं काय?
बारावीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम उपलब्ध
चौथ्या वर्षाला संशोधनावर भर असले
एक वर्षाचे पदव्युत्तर शिक्षणानंतर थेट पीएच.डी. ला प्रवेश मिळेल
अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये
संशोधन पूरक आणि उद्योगांना अपेक्षीत अभ्यासक्रमांची रचना
शेवटच्या वर्षाला संशोधनाची संधी
उद्योग, तज्ज्ञ, माजी विद्यार्थी आदींचा सहभाग
प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तयार आहे
सर्वसामान्यांना परवडेल या दरात उपलब्ध करणार
नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य सरकारचे स्वतःचे एक व्यापक सर्वंकष धोरण असायला हवे की जे सर्व विद्यापीठांना लागू होईल. केवळ धोरण असून चालणार नाही. तर त्याच्या अंमलबजावणीचा आराखडाही हवा. वैयक्तीक पातळीवर विद्यापीठे याची सुरवात करतील पण आशा राज्यस्तरीय धोरणाचा समग्र अंमलबजावणी जास्त प्रभावशाली ठरेल.
- प्रा. डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीबरोबर उद्यमशीलता विकसित व्हावी म्हणून या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. यातून नवउद्योजक, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार, व्यावसायातील नेतृत्व घडावे हाच प्रयत्न आहे. या वर्षी विद्यापीठात सुरू होणारा हा अभ्यासक्रम येत्या काळात महाविद्यालयांमध्येही पाहायला मिळेल.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.