पुणे - ‘तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जी-२० परिषदेत सायन्स-२० मध्ये सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेनुसार चांगल्या भवितव्यासाठी सर्वांगीण आरोग्य, लोकाभिमुख विज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यावर करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे,’ अशी भावना वैज्ञानिकांनी परिसंवादात व्यक्त केली.
‘विज्ञान भारतीचा पश्चिम महाराष्ट्र विभाग’, ‘भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी’ (इनसा) आणि ‘भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी-आयआयटीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. ३) ‘सायन्स २०’ या बैठकीत ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यतेला पोषक वातावरणनिर्मिती’ या विषयावर
परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आयआयटीएम’ संस्थेत झालेल्या परिसंवादाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ‘इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष शर्मा, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन, ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’चे डॉ. अरविंद रानडे, ‘इंडियन नॅशनल सायन्स’चे कार्यकारी संचालक डॉ. ब्रजेश पांडे, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे आणि सचिव डॉ. मानसी माळगावकर उपस्थित होत्या.
डॉ. शेखर मांडे म्हणाले, ‘विकासाच्या दृष्टीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व यासंदर्भात ‘सायन्स-२०’ अंतर्गत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने शाश्वत विकास आणि त्यात तंत्रज्ञानाचे योगदान यावर ऊहापोह झाला. या चर्चेतून अनेक प्रस्ताव मांडण्यात आले असून, आगामी काळात त्यावर काम होईल. तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.’’
डॉ. शर्मा म्हणाले, ‘मानवकेंद्री तंत्रज्ञान विकसित करायला हवे. आरोग्य सुविधा चांगल्या व सुरक्षित व्हाव्यात. बाह्य व आंतरिक स्वास्थ्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी अक्षय, हरित ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवणे गरजेचे आहे.’ डॉ. रानडे म्हणाले, ‘तंत्रज्ञान जसे मानवासाठी वरदान ठरले आहे, तसेच त्यामुळे काही आव्हाने देखील निर्माण झाली आहेत.
त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. पृथ्वीचा होत असलेला ऱ्हास, अणुऊर्जेचा दबावतंत्रासाठी होणारा वापर, अशी काही आव्हाने आहेत.’ चैतन्य गिरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश शौचे यांनी आभार मानले.
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले काम होत आहे - डॉ. भटकर
डॉ. विजय भटकर यांनी ऑनलाइन संवाद साधला. ‘विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले काम होत असून, आगामी काळात लोकाभिमुख तंत्रज्ञान विकसित करण्यावर अधिक भर द्यायला हवा. ‘सायन्स-२०’मधून आलेल्या सूचना व प्रस्ताव याचा यासाठी उपयोग होईल,’ अशी अशा त्यांनी व्यक्त केली. ‘हरित भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा' आणि 'समाज व संस्कृतीसाठी विज्ञान' या विषयांवर चर्चासत्रे पार पडली.
सार्वत्रिक समग्र आरोग्यावरही चर्चा
पुणे - कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘सार्वत्रिक समग्र आरोग्य’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. यात आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक भूषण पटवर्धन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) आणि श्री धूतपापेश्वरचे व्यवस्थापकीय संचालक रणजित पुराणिक सहभागी झाले होते.
पटवर्धन म्हणाले, ‘विविध मार्गातून आपण पर्यावरणावर अतिक्रमण करत आहोत. पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांनी दिलेले इशारे सरकार किंवा नागरिक गंभीरपणे घेत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. माणसापेक्षा व्यवसायाच्या दृष्टीने पर्यावरणीय बाबींचा विचार केला जात आहेत. त्याचे विविध दुष्परिणाम आपण अनेक आजारांच्या माध्यमातून भोगत आहोत.
आपली संस्कृती, परंपरा आणि आपली बलस्थाने असलेल्या इतर बाबींकडे दुर्लक्ष करून आपण जागतिक पर्यावरण चांगले करू शकत नाही. आरोग्य हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपल्या मुळाशी जाऊन ते चांगले राखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘चांगले आरोग्य लाभण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सध्या आपण आजार शोधण्यावर भर देत आहोत. त्यापेक्षा आजार होणारच नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आजार दूर करण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन वाढायला हवे. कोणत्याही वार्इट बाबींचा कोणाला दोष देण्यापेक्षा सर्व चांगले कसे होईल, याचा विचार करावा. त्याप्रमाणे आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.