यंदाच्या मिरवणुकीसाठी निर्बंध नसल्यामुळे अनेक मंडळांकडून ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडण्यात आले आहेत.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक विक्रमी ३० तास चालली. दरम्यान शेवटचे मंडळ टिळक चौकात आल्यानंतर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी आपल्यावरील ताण कमी केला असून डीजेच्या तालावर डान्स केला. मिरवणूक संपली असून शेवटच्या काही मंडळाच्या गणपतीचे लवकरच विसर्जन होईल.
२०१४ मध्ये २९ तास १२ मिनिटं मिरवणूक चालली होती. त्यानंतर यावर्षी विक्रमी वेळ नोंदवत पुण्यात ३० तास मिरवणूक चालली.
दुपारी ३ वाजून १५ मिनिटापर्यंत अलका टॉकीज चौकातून २०६ गणेश मंडळे पुढे सरकली आहेत.
पुण्यात अजूनही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. पुण्यात गेल्या 27 तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू असून अजूनही अनेक मंडळे अलका टॉकीज चौकात येणं बाकी आहे.
पुणे : बाप्पांची वाजत-गाजत मिरवणूक अद्याप सुरुच आहे. याचवेळी डुल्या मारुती चौकात शेवटच्या गणेश मंडळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेत बाप्पाला निरोप दिला.
यंदा २४ तास उलटून गेले तरीही अजून मिरवणुका सुरूच आहेत. त्यामुळे पुणेकरांनी मिरवणुकीचा विक्रम मोडला आहे.
दुपारी १ वाजून ५३ मिनिटापर्यंत अलका टॉकीज चौकातून १७८ गणेश मंडळे पुढे सरकली आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सकाळी ६:४५ वा विसर्जनासाठी निघाल्यानंतर आज दुपारी एक वाजेपर्यंत ६३ मंडळे बेलबाग चौकातून पुढे सरकली आहेत. डिजेच्या आवाजाने पेठा दणाणून गेल्या आहेत. महिला, मुली, तरूणांचा उत्साह मिरवणुकीत दिसून येत आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी मिरवणुकीला उशीर झाला असून पोलिसही या दिरंगाईला वैतागले आहेत. "कोणाला काही बोलायचं नाही, मारहाण करायची नाही, भांडणे झाली तरच हस्तक्षेप करायचा" अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या, आता शेंबड पोरग पण आमचं ऐकत नाही, पोरींकडे बघुन अश्लील हातवरे करतायेत, तरीही आपण काहीच करायचं नाही, पोलिसांना रंडक करून ठेवलाय साहेब यंदा." असा संताप पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या दिवशीही जल्लोष कायम असून मानाच्या गणपतीसहित दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्यानंतर पोलिसांकडून इतर मंडळांना पुढे सरककवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर पोलिसही ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करताना दिसत आहेत.
पुण्यात गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मानाच्या पाचही गणपतीचे काल रात्रीपर्यंत विसर्जन झाले असून आज दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर आता इतर मंडळांची विसर्जन मिरवणूक चालू असून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. आज दुपारनंतर विसर्जन सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे. पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले असून दरवर्षीपेक्षा यावर्षी विसर्जनाला जास्त वेळ लागला आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी अवघा काही अवधी शिल्लक असून गणपतीची महाआरती सुरू आहे. थोड्याच वेळात गणपतीचे विसर्जन होईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य पारंपरिक मिरवणुक पाहण्यासाठी हजारो जणं गर्दी करत असतात. विसर्जन मिरवणुकीवेळी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये एकत्र येत असतात. आज देखील बाप्पांचा रथ अलका टॉकीज चौकात दाखल होताच "गणपती बाप्पा मोरया" चा गजर झाला आणि नागरिकांनी हे दृश्य टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती.
पुणे : आखिल मंडई गणपती गेल्या पाऊण ते एका तासापासून एकाच जागी थांबला असून मंडई मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. बाकीच्यांना पुढं सोडताय, आम्हाला का नाही सोडत आहे. काय चालू आहे हे, थेट महापालिका स्वागत कक्षात येऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत धारेवर धरलंय. गेल्या 1 तासापसून पोलिस कुमठेकर आणि केळकर रोड वरून येणाऱ्या मंडळांना पुढं ढकलत असल्याने मंडई मंडळाचे कार्यकर्ते चिडल्याचं चित्र आहे. दरम्यान, आखिल मंडई मंडळ ०९.५७ वाजता टिळक चौकामध्ये दाखल झाल्याचं कळतंय.
दगडूशेठ हलवाई गणपती सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाला आहे. त्यामुले गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. अलका चौकात थोड्याच वेळात पोहचेल अशा शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे टिळक चौकात आगमन झालं आहे.
पोलिसांकडून टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरील मंडळे वेगात पुढे काढण्याचा प्रयत्न सुरू.विसर्जन मिरवणुक पाहात केळकर रोड वरून येणाऱ्या गणेश मंडळांना पुढे जाण्यासाठी पोलिस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. विसर्जन मिरवणुकीचा दुसरा दिवस उजाडला असला तरी अद्याप मिरवणुक संपली नसल्याने मंडळांना मिरवणूक पुढे नेण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुण्यातील पत्र्या मारुती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत अभिनेते अशोक सराफ यांच्या जीवनावर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाकडून अशोक "मामांचा हास्य रथ" असे देखाव्याला नाव देण्यात आले आहे. तसेच, अशोक सराफ यांच्या चित्रपटतील प्रसिद्ध असलेले डायलॉग वापरून काही फ्लेक्सदेखील लावण्यात आले आहेत.
पुण्यात २२ तासाहून अधिक काळ ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून दोन तास जागेवरून हललेच नाही. त्यामुळे पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी , पोलिसांनी आणि प्रशासनाने वारंवार विनंती करूनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त मंडळाचा डी जे बंद करण्यासाठी गेले. मात्र तरीही दीपक पोटे यांनी मंडळ अलका चौकात येताच महापालिकेच्या स्टेजवर जाऊन माईक स्वतः हातात घेतला आणि डी जे लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डी जे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोटे यांचे गणेश मंडळ रात्री बारा वाजता पुण्यातील अलका चौकातून विसर्जनासाठी पुढे गेले.
पोलिस आणि श्रीमंत साईनाथ तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. अलका टॉकीज चौकात दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मंडळ एका जागेवरून पुढे जात नसल्याने कार्यकर्त्यांना पुढे ढकलले. विसर्जन मिरवणूकीला दरवर्षीपेक्षा जास्त उशीर झाल्याने विसर्जन मिरवणुका पुढे नेण्यासाठी आता पोलिस अँक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे.
काल सकाळी सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक आज देखील सुरू आहे. आज सकाळी ६ चा ठोका पडताच सार्वजनिक मिरवणुकीत डिडीजे जे पुन्हा सुरू झाले आणि अलका टॉकीज मध्ये उभे असलेल्या भाविकांनी डीजे वर ठेका धरला. सुमारे ६.३० ते ७.२० दरम्यान अलका टॉकीज पासून पुढे मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक मंडळाने लाऊड स्पीकर लावले होते. यामुळे अलका टॉकीज चौकात एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान ही मिरवणूक अजून काही तास सुरू राहणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ गणपती रथा मध्ये विराजमान झाला असून स्वानदेश असलेल्या आणि मोत्याच्या दिव्यांनी उजळून निघालेल्या रथातून मिरवणूक सोहळा निघणार आहे. थोड्याच वेळात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, दरम्यान यंदा पहिल्यांदाच मिरवणुकीला झाला उशीर झाला आहे.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीत सकाळचे ६ वाजताच डीजेचा दणदणाट पुन्हा एकदा सुरू झााला आहे. ६ वाजता सार्वजनिक गणेश मंडळांकडून डीजेला सुरुवात झाली आहे. तसेच स्पीकरसाठी थांबलेले अनेक गणेश मंडळ पुन्हा रांगेत येणार आहेत. यामुळे आधीच रेंगाळलेली विसर्जन मिरवणूक अधिकच लांबण्याची शक्यता आहे. अनेक सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीतील असंख्य मंडळे अजूनही रांगेतच आहेत. यातच स्पीकरसाठी थांबलेली मंडळे 6 वाजता पुन्हा रांगेत येणार आहेत. यामुळे यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात लांबण्याची चिन्हे आहेत.
शनिपार मंडळ ट्रस्टने बनविलेला विसर्जन मिरणुकीसाठीचा देखावा टिळक चौकात आल्यानंतर विजेच्या तारांना अडथळा ठरू लागला, मंडळांचे कार्यकर्ते यांनी मोठ्या शिताफीने मूर्ती खाली उतरविली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी सुटकेचा निःश्वास टाकत टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
जागृत गणपती मंडळ ट्रस्ट या सार्वजनिक गणेश मंडळाने कुठले ही वाद्य न वाजवता बाप्पाची मिरवणूक काढत एक नवा आदर्श घालून दिला. जागृत गणपती मंडळ ट्रस्ट हे पुण्यातील रास्ता पेठ येथे स्थित आहे. या गणपती मंडळाने मिरवणुकीत कुठलं ही ढोल पथक किंवा डीजे न लावायचे कारण म्हणजे समाजात एक चांगला संदेश जावा हे असल्याचे सांगण्यात आले. डीजे नसला तरी बाप्पाला निरोप दिला जाऊ शकतो हा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या गणेश मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान फक्त गणेश स्त्रोताचे पठण करण्यात आले.
पुणे : दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी पुण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी लोटली आहे. पहाटे ४ वाजता सुद्धा पुण्यात भाविकांचा उत्साह कायम आहे अगदी पहाटे ४ वाजता सुद्धा अलका टॉकीज चौकात तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. ढोल ताशाच्या तालावर थिरकण्यात तरुणाई गुंग झाली आहे.
पुणे : गेल्या एक ते दीड तासापासून कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरून एकही मंडळ अलका टॉकीज मार्गे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले नाही. या दोन्ही रस्त्यावरून बहुतांश गणेश मंडळ हे डीजे सिस्टीमचा वापर करत असतात रात्री १२ नंतर डिजेला परवानगी नसल्याने अनेक मंडळांचे रथ त्याच जागी आहेत. लक्ष्मी रोड वर देखील गणेश मंडळणामध्ये खूप मोठे अंतर पडले आहे.
मेट्रो पुलाची उंची पाहता सगळ्या सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी रथाची उंची ठरवून दिली होती. याच अनुषंगाने पुण्यातील जनार्दन पवळे संघ या मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी हायड्रॉलिक ट्रॉली चा वापर केला. मेट्रो पुलाला कुठला ही अडथळा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन या मंडळाने हायड्रॉलिक ट्रॉलीचा उपयोग केला. लक्ष्मी रोड वरून येणाऱ्या विसर्जन मिरवणूक रथासाठी १८ फूट उंचीची मर्यादा होती.
पुणे : चंद्रा, अहो शेठ खूप दिवसांनी झालीय या भेट, तेरी औंखो का काजल मन करे जो घायल, सैराट, छात्रपती शिवाजी महाराजांवरील गाणे, मैं हू खलनायक, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, श्री वल्ली, अश्विनी ये ना.. आदी उडत्या चालीच्या गाण्यांवर केळकर रत्यावरील गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणाई बेधुंद होत थिरकली.
नियम धाब्यावर बसवत कुमठेकर रस्त्यावर डीजेचा दणदणाट पुन्हा सुरु झाला आहे. रात्री बारा नंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर निर्बंध आहेत, मात्र पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर नियम मोडल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चौकातून आतापर्यंत केवळ मोजकीच मंडळे मार्गस्थ झाली आहेत..
श्री शिवाजी मित्र मंडळ : २.५०
शिवाजी मंदिर मंडळ सदाशिव पेठ : ३.३२
काचेचा गणपती सार्वजनिक ट्रस्ट : ७.३०
ग्राहक पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : ७.४५
श्रीराणा प्रताप नवी पेठ - ८.४५
अलका चौकाचा राजा समाज विकास मंडळ - ९.२८
विश्वास सांस्कृतिक मित्र मंडळ - १०.५७
अष्टविनायक गणेश मंडळ - ११.३०
अखिल टिळक रोड छत्रपती शिवाजी मंडळ - ११.४४
रात्री १२ नंतर डीजे बंद करण्यात आले आहेत, तर रस्त्यांवर केवळ पारंपरिक ढोल ताशा वादन सुरू आहे. अद्याप रस्त्यांवर मंडळांची मोठी रांग आहे .
गजानन, जिलब्या, बाबू गेनू, भाऊ रंगारी, मंडई, दगडूशेठ यापैकी एकही गणपती लक्ष्मी रस्त्यावर आलेला नाही.
पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीची रथ पुढे जात नसल्याने पोलिस आयुक्त थेट रस्त्यावर उतरले. ८.३० वाजल्यापासून भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ (अचानक) मित्र मंडळ हे कुमठेकर रोड वर थांबले होते. वारंवार अनेक मंडळाने पोलिसांना आणि महापालिका प्रशासनाला सांगून सुद्धा मंडळ त्यांचा गाडा पुढे घ्यायला तयार नव्हते. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वतः यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन दीपक पोटे यांच्या मंडळाला पुढे जाण्यास सूचना दिल्या . यासह पोलिस आयुक्त यांनी महापालिकेच्या मंचावर असलेल्या काही कार्यकर्त्यांना हाकलले. यामुळे काही काळ अलका टॉकीज चौकात तणाव निर्माण झाला होता
पुणे : विसर्जन मिरवणूकीला नेहमीपेक्षा पाच तास उशीर झाला आहे. मंडई आणि भाऊ रंगारी गणपती अजून जाग्यावरच. १२ वाजले तरीही ही मंडळे मंडईतील टिळक पुतळ्याजवळ आहेत.
कुमठेकर रस्त्यावर १० वाजेपर्यंत ६ मंडळे पास झाली आहे. मंद गतीने मंडळाचे गणपती पुढे सरकत आहे. वाद्य पथकांची संख्या यंदा तुलनेने जास्त, डिजेच्या तालावर तरुणाई थिरकतेय. प्रचंड उत्साह आणि गर्दी असून कुमठेकर रस्त्याला आडव्या येणाऱ्या गणपतीची संख्या जास्त आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा मिरवणुकीला उशीर होण्याची शक्यता आहे.
टिळक रोडवर मार्केटयार्डचे मंडळ एसपी कॉलेज समोर आले असता मोठी गर्दी झाली आहे. नादब्रम, शिवसुर्य आणि राघमंत्र या तीन पथकाचे वादन सुरू आहे. अर्था तास झाला मंडळ जागेवरच असून पथकांनी रस्त्या व्यापल्याने गणेश भक्तांना चालायला जागा राहिलेली नाही.
शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील म्हणजे लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावर दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनीवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.
पुण्याच्या मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जन झाले आहे. त्यानंतर आता इतर मंडळांची मिरवणूक पुढे येत असून भाऊ रंगारी आणि दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सकाळपर्यंत टिळक चौकात येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन झाले आहे.
कसबा गणपती
तांबडी जोगेश्वरी
गुरूजी तालीम
तुळशीबाग गणपती
केसरीवाडा
या पाचही गणपतींचे विसर्जन झाले आहे.
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे डेक्कन येथील पांचाळेश्वर विसर्जन घाटावर ८ वाजून ५० मिनिटांनी झालं विसर्जन.
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीच झालं विसर्जन जवळपास ११ तास मिरवणुका चालल्या ११ तासनंतर सर्व विसर्जन झालं, सर्व मानाच्या गणपतीच कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलंय...
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती टिळक चौकात येण्याआधी कुमठेकर रस्त्यावरून अनंत मित्र मंडळ आणि पोटसुळ्या गणपती मंडळ चौकात दाखल झाले असल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची पळापळ झाली आहे. दरम्यान पोलिसांनी मंडळाला सूचना दिल्या आहेत.
भाऊ रंगारी गणपती मंडळाची ढोल ताशाचे 5 पथके असणार आहेत. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात पोचण्यास नेहमीपेक्षा अधिक वेळ लागणार.
जिलब्या मारुती, भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ आणि मग दगडूशेठ बेलबाग चौकात येणार.
- मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा येण्याची वेळ असताना मध्येच श्री पोटसुळ्या मारुती मंडळाच्या गणपतीची पालखी आली. अनेकांना वाटले केसरीवाडा गणपतीची पालखी एवढ्या कमी वेळात कशी दाखल झाली.
- एकीकडे केसरीवाडा गणपतीच्या शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे वादन सुरू आहे आणि मध्येच लक्ष्मी रोडवरून श्री पोटसुळ्या मारुती मंडळाची विसर्जन मिरवणूक आली.
कसबा आणि तांबडी जोगेश्वरी नंतर आता गुरूजी तालीम गणपतीचेही विसर्जन झाले आहे. त्यानंतर आता तुळशीबाग आणि केसरीवाडा या दोन मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे.
सर्वांत उंच असणारा गणपती टिळक चौकात दाखल झाला आहे.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान ढोल ताशाबरोबरच मल्लखांब यासारखे मर्दानी खेळ खेळत गणपतीला वंदन करण्यात आले
आमदार रोहित पवार यांनी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालिम मंडळासमोर ढोल पथकासोबत ढोल वाजवला.
मानाचा पहिला कसबा आणि दुसरा तांबडी जोगश्वरी या दोन्ही गणपतींचे विसर्जन झाले आहे.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती टिळक चौकात आल्यावर स्व-रीपवर्धिनी ढोल ताशा पथकाद्वारे 'वंदे मातरम्' हे गीत गाण्यात आले
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती तब्बल एक तास ढोल वादनानंतर आता गणपतीचा विसर्जन मिरवणुकीचा रथ टिळक चौकात दाखल.
मानाचा चौथा गणपती : श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ नगारा पथकाचे टिळक चौकात आगमन
तुळशीबाग गणपती टिळक चौकात दाखल
गुरुजी तालीम मंडळाचा नगारा टिळक चौकात दाखल
गर्जना ढोल ताशा पथक टिळक चौकात आगमन
पुण्यातील अलका चौकात गणेशोत्सवामुळे गर्दी असतानाही सर्व गणेशभक्तांनी वाट करून दिली आहे.
विसर्जन मिरवणुकीला उशीर झाल्यामुळे मानाच्या तिसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाने स्वयंशिस्तीने टिळक चौकात वादन केले नाही - राजाभाऊ टिकर
कोथरूड मधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरू असून महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. येथील संगम तरुण मंडळाने भगव्या रंगाच्या टोप्या बनवल्या आहेत. त्या घालून महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
दत्तवाडी विसर्जन मिरवणूकीची सुरुवात वृंदावन नर्सरी पानमळा येथून अत्यंत दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली.
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला आहे. सात तासापेक्षा अधिक काळ मिरवणूक पार पडल्यानंतर विसर्जन झाले.
मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीतील नगारा टिळक चौकात दाखल झाला असून
गणपतीच्या स्वागतासाठी पुण्यातील अलका चौकात साडेतीनशे फूट लांबीची रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळीसाठी १ हजार किलो गुलाल, दीड हजार किलो पांढरी रांगोळी, २०० किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे.
दुपारी ३.११ वाजता मानाचा पहिला कसबा गणपतीचे टिळक चौकात आगमन
विजय टॉकीज चौकात कसबा गणपती गेल्या दीड तासापासून आहे. टिळक चौकातील रांगोळी काढून होत आहे. त्यासाठी संथ गतीने सुरू मिरवणूक सुरू आहे.
राष्ट्रीय कला अकादमीतर्फे रांगोळी पूर्ण
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. या मिरवणुकीत रथावर विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. तसंच आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. ही सजावट भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसमोर शिवगर्जना पथकाने आझादी का अमृत महोत्सव ही थीम घेत जल्लोष केला.
मानाच्या पहिल्या गणपती आधीच मंडळ दाखल झालं. मात्र लोकांच्या आक्षेपानंतर विसर्जन मिरवणूक शास्त्री रोडने वळवण्यात आली. महापालिकेकडून सत्कार स्विकारण्यासाठी बोलावण्यात आले. मग पत्रकारांच्या, लोकांच्या आक्षेपानंतर मंडळ शास्त्री रोडने वळवले. पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या आधी लहान मंडळांच्या गणपतींचं विसर्जन व्हावं, अशी याचिका पुण्यातल्या मंडळांनी दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीत शिवमुद्रा ढोल ताशा पथकसमवेत पोलीस कर्मचाऱ्यांनीही ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात लाडक्या गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे. पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय.
पुण्यातला मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. राजकीय मतभेद विसरुन एकत्र आलेल्या दोघांनी कसबा गणपतीची पालखी एकत्रच उचलली.
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात रुद्र्गर्जना या पथकात एका ढोल वादकाचा हाथ फ्रॅक्चर होता मात्र तरीही तो ढोल वाजवण्यात तल्लीन झाला होता.
पुण्यातल्या बेलबाग चौकात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यानच एक बैल उधळल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उपस्थितांनी त्या बैलाला धरुन ठेवलं आणि शांत केलं.
विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी पत्नी सह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीला अभिषेक करून आरती केली आणि गणरायाला प्रार्थना केली.
आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला आहे. अनेकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमलेल्या तरुणी 'आदित्य आदित्य' म्हणत जल्लोष करत आहेत. दरम्यान, आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी , विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नीलम ताई, चंद्रकांत दादा, दादा भेटले, राजकारण विषयी काही झाले नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
पुण्यातला मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
पुण्यातल्या कसबा गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मराठी कलाकारांचा सहभाग असलेलं कलावंत ढोल ताशा पथक सज्ज झालं आहे. त्यातल्या काही कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवच्या सार्वजनिक मिरवणुकीला काही वेळात सुरुवात होणार आहे. मिरवणुकीसाठी पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) यांच्या तर्फे ३० फुटी रांगोळी साकारण्यात आली आहे. सक्सेस, डिप्रेशन, एज्युकेशन या थीमवर अकादमी कडून रांगोळी काढण्यात आली आहे. पायघड्याही घालण्यात आल्या आहेत.
उद्धव ठाकरेंचं सरकार असतं तरी निर्बंधमुक्त केला असता. त्या वेळी माणसं जगवणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे निर्बंध लावले होते. स्वतः पंतप्रधान मोदींनीही लॉकडाऊन जाहीर केला होता. दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात केरळमध्ये संख्या जास्त होती. ही संख्या आटोक्यात आणायची म्हटलं तर निर्बंध लावावे लागत होते, म्हणून ही बंधनं होती. पण आता ही बंधनं हटवली गेली. त्यातून वेगळा अर्थ काढायची गरज नाही. बाप्पाच्या दर्शनाला आलं की दरवेळी मागणंच करायचं असं नाही - सारखं त्यांना साकडं घालून घालून काही अर्थ नाही.
इथे वाहने पार्किंग करू नका...
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फग्युर्सन रस्ता, खंडुजी बाबा चौक ते वैशाली हॉटेलदरम्यान जोडणाऱ्या उपरस्ता परिसरातील १०० मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी राहील.
इथे करा वाहने पार्किंग...
एच. व्ही. देसाई कॉलेज, पुलाची वाडी नदी किनारी, पूरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभार वेस, काँग्रेस भवन मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग नारायण पेठ.
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : काकासाहेब गाडगीळ जंक्शन ते जेधे चौक.
लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते टिळक चौक
बाजीराव रस्ता : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक
गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक
केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक
लाल बहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक
जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडुजी बाबा चौक
गुरू नानक रस्ता : देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक
प्रभात रस्ता : डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक
कर्वे रस्ता : नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक
फग्युर्सन महाविद्यालय रस्ता : खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन महाविद्यालय प्रवेशद्वार
भांडारकर रस्ता : पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक
पुणे सातारा रस्ता : व्होल्गा चौक ते जेधे चौक
सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज् चौक ते जेधे चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.