पुणे - शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. या मिरवणूक कालावधीत नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दोन दिवस शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.
तसेच, मुख्य मिरवणूक मार्गांवर अग्निशामक दल, पोलिस, रुग्णवाहिका आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील रथ वगळता अन्य वाहनांना बंदी राहील. बुधवारी (ता. १८) मिरवणूक संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.