स्वारगेट - गणेशोत्सव पाच दिवसांवर आल्याने गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी उत्साहात तयारी सुरू झाली आहे. सजावट, पूजा साहित्य, आभूषणे यांबरोबरच गणेशाला आवडणाऱ्या नैवेद्याला ग्राहकांकडून मागणी होत आहे. त्यासाठी आगाऊ नोंदणीही केली जात आहे. विविध प्रकारचे मोदक, लाडू, पेढे, बर्फी आदी विविध प्रकारांना मागणी वाढू लागली आहे.
खवा, काजू, आंबा व मावा अशा मोदकांच्या विविध प्रकारांनी दुकाने सजली असून, ग्राहकांची या पदार्थांना पसंती मिळत आहे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या विदर्भ, मराठवाडा भागातील नागरिकांसाठी तळणीचे मोदक बनवले जात आहेत. प्रतिनग ३५ रुपये या दराने मोदकांची विक्री होत आहे. तसेच, गौरींच्या फराळासाठी बेसन, मोतीचुराचे लाडू, चकली, बर्फी, शंकरपाळी, अनारसे हे पदार्थ बनविण्यासाठी तयारी सुरू आहे.
दूध व सुकामेव्याचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम खाद्य पदार्थांवरही दिसून येत आहे. मोदक तसेच अन्य मिठाईच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील नैवैद्यासाठी महिला बचत गट पुढाकार घेत असून त्याद्वारे महिलांना घरीच रोजगार मिळत आहे. अनेक संस्था, मंडळे प्रसादासाठी बचत गटातील महिलांशी संपर्क साधत आहेत. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांना मागणी वाढत आहे.
पेढे, मोदक, पुरणपोळीला मागणी वाढू लागली आहे. तसेच, गौरी आगमनासाठी लागणाऱ्या पदार्थांचाही खप वाढत आहे. मोदकामध्ये विविध प्रकार आहेत. त्यांचीही दरवर्षी मोठी विक्री होते. यंदाही त्यासाठी तयारी सुरू आहे.
- श्रीकृष्ण चितळे, चितळे बंधू मिठाईवाले
ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. नैवेद्य म्हणून मोदकांना जास्त मागणी आहे. चॉकलेट, ब्ल्यूबेरी मोदकांना जास्त मागणी आहे. पारंपरिक मिठाईसोबतच नवीन मिठाईला पसंती देत आहेत.
- महेंद्र गाढवे, संचालक, काका हलवाई
अनेक वर्षांपासून आम्ही मोदक बनविण्याच्या व्यवसायात आहोत. या माध्यमातून महिलांना रोजगाराचे चांगले साधन उपलब्ध झाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून आमच्याकडे ३५ महिला काम करत आहेत. परदेशातूनही मिठाईला मागणी आहे. गणेश आगमनाच्या दिवशी पुणे शहरात दीड लाखाच्या आसपास मोदक विक्री होईल, असा अंदाज आहे.
- किशोर सरपोतदार, अध्यक्ष, रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.