भामगिरीच्या मार्गावर घाणींचे साम्राज्य ; भाविकांसह कामगारांचा प्रवास ठरतोय जीवघेणा

Garbage is being dumped on Bhamchandra Dongar Road in Khed taluka 2.jpg
Garbage is being dumped on Bhamchandra Dongar Road in Khed taluka 2.jpg
Updated on

आंबेठाण (पुणे) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भामचंद्र डोंगराच्या मार्गावर सध्या घाणींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एमआयडीसीच्या मध्यातून जाणाऱ्या या मार्गावर मेलेल्या जनावरांसह बांधकामाचा राडारोडा टाकला जात असल्याने भाविकांसह कामगारांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. याशिवाय या कचऱ्यावर भटकी कुत्री वावरत असल्याने भीतीपोटी भाविक, शालेय विद्यार्थी आणि कामगार यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या भागात दिवसागणिक साठत असलेले कचऱ्याचे ढीग उचलून प्रवास सुकर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भामचंद्र डोंगर (ता.खेड) हे 'क' वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. पूर्वीपासून या डोंगराला भामगिरी म्हणून ओळखले जात आहे. डोंगरात कोरलेले महादेव मंदिर, तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी अशी पवित्र स्थाने असल्याने येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. कधीकाळी निसर्गसंपन्न असणाऱ्या या डोंगराला सध्या प्रदूषणासह घाणीचे ग्रहण लागले आहे. या डोंगराकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग असणाऱ्या चाकण-वांद्रा या मुख्य रस्त्याच्या कडेला घाणीसह कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

त्यात मेलेली जनावरे, मेलेल्या कोंबड्या, चिकन दुकानातील उरलेले तुकडे, हॉटेल मधील शिल्लक राहिलेले अन्न, केश कर्तनालयातील केस, जुन्या बांधकामाचा राडारोडा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, भाजी बाजारामधील उरलेला भाजीपाला आणि अन्य कचरा भर वर्दळीच्या रस्त्यालगत टाकला जात आहे. त्याचे ढीग रस्त्यावर आल्याने वाहतुकीला धोकादायक तर ठरत आहेच, पण प्रवाशांना मात्र नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांचे विद्रुपीकरण होत आहे. दिवसागणिक वाढत जात असलेल्या या कचऱ्याच्या साम्राज्याबद्दल पर्यावरण प्रेमी आणि उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वासुली फाटा येथून भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असा राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. आधीच खड्डयामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असताना रस्त्यात राडारोडा टाकला जात असल्याने रस्ता वाहतुकीसाठी अरुंद ठरत आहे. या भागात मोठ्या नामांकित कंपन्या आहेत. यांच्यासह एमआयडीसीकडून देखील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशी यांच्याकडून एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि बांधकामाचा राडारोडा टाकला जात आहे. एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेला खाजगी जागेत सुरू असणारे व्यवसाय किंवा काही प्रमाणात एमआयडीसीमधील कारखानदार त्यांचा कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देत आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केलेल्या प्रशस्त रस्त्यांची कचराकुंडी होत चालली आहे. 

या भागात ग्रामपंचायतीद्वारे पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांवर ताण येऊन कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे. कचरा जमा करण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची मोठी अडचण ग्रामपंचायतीसमोर उभी राहिली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्त्याच्या कडेची जागा सोपी वाटत असल्याने बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग जमा होऊ लागले. तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गावर अशी स्थिती असल्याने परिसरातील ग्रामपंचायतीनी याबाबत जागृत होऊन अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यावर कडक व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

भौतिक सुबत्तेच्या नावाखाली सुरू असलेली अवहेलना दुर्दैवी आहे. कचऱ्याचा पडत असलेला वेढा ही डोंगराच्या पावित्र्याला आणि तुकोबांच्या साक्षात्कार अधिष्ठानाला अपमानित करणारी निराशाजनक परिस्थिती आहे. स्थानिक व्यावसायिक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी या भूमीचे पावित्र्य जपावे.
- ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर, युवा कीर्तनकार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.