पुणे : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती (जि. पुणे) येथे पशूधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची सुरुवात झाली आहे. याठिकाणी जातिवंत दुधाळ गीर, साहिवाल देशी गाय, मुऱ्हा, पंढरपुरी म्हैस आणि होल्स्टिन फ्रिजीयन संकरित गायींबाबत विशेष संशोधन सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती पंचक्रोशीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी, शैक्षणिक, पशूपालनातील उपक्रम आणि संशोधन प्रकल्पांना चालना मिळाली आहे. या परिसरात कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयाच्या बरोबरीने पशूपालकांसाठी दिशादर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा दाखविणाऱ्या पशूधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची सुरवात झाली.
या केंद्राच्या वाटचालीबाबत माहिती देताना केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे म्हणाले की, २०१५ मध्ये संस्थेचे सीईओ नीलेश नलावडे आणि मी नेदरलॅंन्डमधील व्हॅन हॉल लॉरेनस्टाईन विद्यापीठाचा प्रकल्प अभ्यासण्यासाठी गेलो होतो. या ठिकाणी डेअरी विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ, शेतकरी, पशुपालन उद्योगातील विविध कंपन्या आणि सरकारी विभाग पशुधनाशी निगडित उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करतात. त्याच पद्धतीचे केंद्र बारामतीमध्ये असावे असा विचार करून ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट''ने प्रकल्प अहवाल तयार केला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची आखणी झाली. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार आणि विश्वस्त रणजित पवार यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन प्रकल्पाच्या उभारणीसाठी लाभले आहे. प्रकल्पाला राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांचे पाठबळ मिळाले आहे.
प्रकल्पाची उद्दिष्टे
जातिवंत दुधाळ गीर, साहिवाल गोवंश, मुऱ्हा, पंढरपुरी म्हशी आणि होल्स्टिन फ्रिजियन या संकरित गाईंबाबत संशोधन, संवर्धन आणि तंत्रज्ञान विस्तार.
शुद्ध वंशाच्या कालवडी आणि वळूंची पैदास. आरोग्य आणि दूध उत्पादनवाढीच्या क्षमतेचा अभ्यास.
संतुलित पशू आहार, गुणवत्तापूर्ण चारा, मूरघास निर्मिती आणि प्रशिक्षण.
जनुकीय प्रयोगशाळेत पशूपालकांकडील जातिवंत कालवडी आणि वळूंची तपासणी.
आजार आणि खनिज कमतरता तपासण्यासाठी रोग निदान प्रयोगशाळा.
आधुनिक मुक्त संचार गोठा
प्रकल्पामधील मुक्त संचार गोठ्यामध्ये देशी गोवंश आणि म्हशी मिळून २००, होल्स्टिन फ्रिजियन २०० आणि गाभण गाई, म्हशी आणि वासरांच्या गोठ्यामध्ये ५० जनावरांची स्वतंत्रपणे विभागणी आहे. वळू आणि रेड्यासाठी स्वतंत्र गोठा आहे. संशोधनाबाबत डॉ.भोईटे म्हणाले की, हवामान बदलामुळे दुधाळ जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होताना दिसतो. प्रक्षेत्रावरील प्रत्येक गाई, म्हशीच्या गळ्यातील पट्यामध्ये ॲक्टिव्हिटी मिटर आणि ट्रान्सपॉंडर आहे. यामुळे दररोजची हालचाल, दूध उत्पादनातील चढ उताराची नोंद होते. त्यानुसार जनावर आजारी आहे, माजावर आहे किंवा कोणत्या अवस्थेत आहे, याची संगणकावर नोंद होते. जनावरांच्या खाद्यामध्ये मूरघास, वाळलेला चारा, संतुलित खुराक, खनिज मिश्रण टिएमआर (टोटल मिक्स रेशन) पद्धतीने एकत्र केले जाते. गाई, म्हशींचे दूध काढणीसाठी आधुनिक मिल्किंग पार्लर आहे.
भ्रूण प्रत्यारोपणाचा प्रयोग
ब्राझिलीयन गीर वळूचे सेक्स सॉर्टेड सिमेन आणि राजकोट किंवा भावनगरमधील उच्चवंशावळीच्या दुधाळ गीर गाईंचे गर्भ यांच्यापासूनच्ा भ्रूण प्रकल्पातील गीर गाईंमध्ये प्रत्यारोपित केला. यातून २३ वासरांचा जन्म झाला. त्यात ब्राझीलियन गीर गोवंशाची २० आणि साहिवालची तीन वासरे आहेत. पाच होल्स्टिन फ्रिजीयन वासरांचा जन्म झाला आहे. चार कालवडी अमेरिकन ब्रिडर असोसिएशनकडून मिळालेल्या भ्रूणातून जन्मलेल्या आहेत.
गुणवत्तापूर्ण दूध निर्मिती
प्रकल्पामध्ये स्वच्छ दूध निर्मितीवर भर
उत्पादन ते पॅकिंगपर्यंत कोणताही मानवी स्पर्श दुधाला होत नाही.
धार काढताना हात, जनावरे, सड तसेच दूध काढणी यंत्राची स्वच्छता
प्रक्रिया युनिटमध्ये लस्सी, पनीर, दही, तूप, आइस्क्रीम निर्मिती
प्रकल्पातील उत्पादनांची ‘ट्रस्ट डेअरी‘ ब्रॅण्डने विक्री केली जाते
गीर, साहिवाल गोवंशाची निवड
गीर आणि साहिवाल या भारतीय गोवंशाच्या निवडीबाबत डॉ.धनंजय भोईटे म्हणाले की, पाऊस कमी पडणारा प्रदेश आणि कोरड्या वातावरणात गीर आणि साहिवाल हे देशी गोवंश तग धरतात. त्यांची दूध देण्याची क्षमता, रोग प्रतिकारशक्ती चांगली आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर भारतातील गुजरात, पंजाब, हरियाना राज्यात हे दोन्ही गोवंश आहेत. सध्या आपल्याकडील गीर गाय प्रति वेत २००० लिटर, साहिवाल २३०० लिटर सरासरी दूध उत्पादन देते. या गोवंशाची चांगली पैदास केली, योग्य व्यवस्थापन ठेवले तर निश्चितपणे दूध उत्पादनवाढीला मोठी संधी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.