अलका चौकातील रॉंग टर्न ठरला मुलीच्या जीवदानाचा यु टर्न

अलका चौकातील रॉंग टर्न ठरला मुलीच्या जीवदानाचा यु टर्न
Updated on

पौड : ब्लड कॅन्सर झालेल्या मुलीच्या उपचारासाठी पैसे गोळा करणाऱ्या पित्याला युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश बलकवडे यांच्या रूपाने आशेचा किरण मिळाला. बलकवडे यांच्या कार्यतत्पर धडपडीमुळे उपचारासाठी कमी पडत असलेल्या बारा लाखाची शासकीय योजनेतून तरतूद झाली आणि चिमुरडीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अर्थात पैसे गोळा करण्याच्या टेन्शनमध्ये दुचाकीवरून रॉंग टर्नमध्ये घुसलेल्या या पित्याला वाहतूक पोलिस आणि आरोग्य मित्रांच्या सहकार्यामुळे मुलीच्या जीवदानाचाच यु टर्न मिळाला.

दुर्वा अमित जाडकर (रा. शिवणे, मूळ रा. अहमदनगर) या दोन वर्षे बावीस दिवसाच्या चिमुरडीला ब्लड कॅन्सर झाला होता. अमित मुंबईला औषध कंपनीत सुपरवायझर होते. मुलीच्या उपचारासाठी ते पुण्यात शिवणे येथे भावाकडे आले होते.दिनानाथ रुग्णालयात डिसेंबरपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दूर्वाच्या केमोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या उपचारासाठी पंचवीस लाख रूपयांचा खर्च सांगितला. मुलीच्या उपचारासाठी पंचवीस लाखाचा खर्च म्हंटल्यावर दुर्वाच्या मातापित्यांवर जणू आभाळच कोसळले. त्यांनी कर्ज घेवून, सोनेनाणे मोडून, उसने घेवून तसेच शासकीय योजनेतून पैशाची जमवाजमव करण्यास सुरूवात केली. कसेबसे तेरा लाख रूपये जमा झाले.

पैसे गोळा करण्यासाठी अमित दुचाकीवरून अलका टाकी चौकातून रात्रीच्यावेळी जात होते. मुलीच्या उपचारासाठी मदत मिळविण्याच्या टेन्शनमध्ये नेमके ते चुकीच्या मार्गाने गेले. त्यामुळे विश्रामबाग पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल अमित जमदाडे यांनी त्यांना आडवले. दुष्काळात तेरावा महिना असेच संकट त्यांच्यावर ओढवले. वाहतूक पोलिसासमोर त्यांना अक्षरशः रडू आवरले नाही. त्यावेळी जमदाडे यांनी जाडकरांची आस्थेने चौकशी केल्यानंतर वाहतूक पोलिसांचाही कंठ दा़टून आला. तिथे कार्यरत असलेले वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक भरत चंदनशीव, अमित जमदाडे, सुहास सुर्यवंशी, अक्षय बांदल, प्रमोद पवार, रहीम शेख यांनी त्यांना धीर दिला. जमदाडे यांनी आरोग्य मित्र जीवन खंडागळे, वैशाली साखरे यांच्याशी संपर्क साधला. खंडागळे, साखरे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत पार्ट टाईम जंबो कोविड सेंटरमध्ये काम करतात. दोघेही अलका टॉकीच्या चौकात आले. जाडकरांची सर्व व्यथा समजून घेतली. त्यांनी लागलीच अविनाश बलकवडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला.

कोरोनाच्या काळात गरजूंची वैद्यकिय बीले कमी करण्यासाठी बलकवडे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. कोरोना काळातील त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दुर्वाच्या आईवडीलांनी बलकवडे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मुलीची कैफीयत सांगून मदतीची विनवनी केली. बलकवडे यांनी तातडीने सूत्रे हलविली. धर्मादाय कार्यालय, रूग्णालय आणि सरकारी यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांच्या धडपडीमुळे विविध योजनांच्या माध्यमातून बारा लाखाची तरतूद झाली. त्यापूर्वी चंदनशीव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच खंडागळे, साखरे यांनीही सोशल मिडीयावर पोस्ट टाकून मित्र, नातेवाईकांकडे दूर्वाच्या मदतीसाठी आवाहन केले. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून एकाच दिवसात सत्तर हजार रूपये जमा झाले. सर्वांच्या तत्पर सहकार्यामुळे दुर्वावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ब्लड कॅन्सरवर मात करून दूर्वाला रूग्णालयातून सोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अलकाच्या चौकात केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तर बलकवडे यांनीही पत्नी सुचेता, कुणाल कांदे, प्रतिक खोमणे यांच्यासह शिवण्याला जावून दूर्वाची भेट घेतली.

खरं तर अलका टॉकीचा चौक माझ्यासाठी लकी ठरला. अविनाश बलकवडे, वाहतूक पोलिस आणि आरोग्य मित्र जीवन खंडागळे, वैशाली साखरे हे माझ्यासाठी देवदूतच आहेत. त्यांच्या मनापासून केलेल्या सहकार्यामुळे माझ्या मुलीवर यशस्वी उपचार होवू शकले. पुणेकरांचे हे ऋण मी आणि माझा परिवार आयुष्यभर विसरू शकणार नाही.-अमित जाडकर (दूर्वाचे वडील) 

(संपादन : सागर डी. शेलार)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.