बारामती : लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जाताना बारामतीच्या व्यापारपेठेकडून गेले अनेक दिवस पाळलेला संयम आता हळूहळू सुटेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत सर्वांनीच उत्स्फूर्तपणे लॉकडाऊनमध्ये सहभागी होत आजवर प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचीच भूमिका घेतलेली आहे.
20 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनला आज 36 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. येत्या 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये सूट मिळण्याची शक्यता नसल्याने व उलट लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याच्या शक्यतांनी आता व्यापाऱ्यांसह समाजाच्या सर्वच स्तरातील घटक अस्वस्थ होऊ लागले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
व्यावसायिक नुकसानीपेक्षाही मानसिक स्वास्थ्य बिघडेल की काय अशी भीती आता सर्वांनाच सतावू लागली आहे. सक्तीच्या विश्रांतीचाही आता लोकांना उबग येऊ लागला असून लॉकडाऊनमध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
व्यापा-यांनी गेले महिनाभर दुकानेच उघडलेली नसल्याने दुकानात धुळीचे साम्राज्य असून, किमान दुकानांची साफसफाई करणे, काही वस्तू खराब झाल्या असतील तर त्या दुकानातून बाहेर काढणे, काही ठिकाणी उंदरांचा प्रादुर्भाव झालेला असल्याची भीती असून कापड दुकानांमधील कपड्यांचीही दुरवस्था झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुकानांची स्थिती काय असेल या कल्पनेनेही दुकानदार अस्वस्थ होत आहेत. त्यामुळे किमान साफसफाईसाठी दुकानांना दररोज किमान तासभर तरी सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे. व्यापा-यांचे नुकसान एका बाजूला मात्र नागरिकांची होणारी गैरसोय मोठी असल्याने आता लॉकडाऊनमधून काही प्रमाणात तरी शिथिलता देण्याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
आता स्थिती पूर्वपदावर आणावी
गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून शिथिलता देऊन व्यापारपेठेची स्थिती पूर्वपदावर आणणे गरजेचे आहे. होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी लवकर व्यापारपेठ सुरु करणे आवश्यक आहे. योग्य ती काळजी घेत व्यवहार सुरु झाल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल.
- नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ.
दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी
कापड व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये कमालीची धूळ झाली असून, कपड्यांचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय अनेक दुकानात उंदराचा प्रादुर्भाव असल्याने त्याचीही भीती वेगळी आहे. सर्वस्थितीचा विचार करुन शिथीलता द्यावी किंवा किमान दुकाने स्वच्छ करण्यास तरी परवानगी द्यावी.
- आनंद छाजेड, कापड व्यावसायिक, बारामती.
लवकर बाजारपेठ पूर्ववत व्हावी
दीड महिन्यांच्या कालखंडानंतर आता बाजारपेठ पूर्ववत होण्याची आवश्यकता आहे. व्यापा-यांचे नुकसान तर होतच आहे, शिवाय ग्राहकांचीही मोठी गैरसोय होते आहे. त्यामुळे आता दुकाने स्वच्छ करण्यास तातडीने परवानगी द्यावी व लवकर दुकाने सुरु करण्याची मुभा मिळावी.
- ऩरेंद्र मोता, कापड व्यावसायिक बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.