खडकीतील हरित परिवाराने घेतले  पर्यावरणाच्या रक्षणाचे व्रत 

SAM.jpg
SAM.jpg
Updated on

पुणे ः दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना त्याचे रक्षण करण्यासाठी सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून खडकीतील हरित परिवार ग्रुपने वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे. वाढते प्रदूषण व दुष्काळापासून मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षारोपण हाच शेवटचा उपाय असल्याचे ओळखून या ग्रुपने निःस्वार्थ भावनेने वृक्षारोपणाचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत स्वखर्चाने पन्नास वृक्षांचे रोपण करुन त्यांचे जतन करण्याची शपथ घेण्यात आली आहे. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

मुळा रस्ता, कोहिनूर इस्टेट, वाकडेवाडी या भागांतील काही सजग नागरिकांनी पुढे येत हरित परिवार ग्रुप स्थापन केला. या कामात त्यांना अनेक अडथळे आले, मात्र ग्रुप मागे हटला नाही. याबाबत अधिक माहिती देताना ग्रुपच्या निर्मात्या साधना शहा म्हणाल्या, की दररोज मॉर्निंग वॉकला येत असताना सगळ्यांची ओळख झाली. या ग्रुपमधील कमलाकर काटकर, रवींद्र नितनवरे, चंद्रशेखर काकडे, बिलाल काझी हे उन्हाळ्यात वॉकला येताना सोबत पिशव्या भरुन पाण्याच्या बाटल्या, कॅन आणत व वॉक करताना वाटेत येणाऱ्या झाडांना पाणी घालत. त्यांच्या या नियमित दिनक्रमामुळे माझ्यातील वृक्षप्रेमी जागा झाला. मी आमच्या सोसायटीतील महिलांना व वॉकला भेटणाऱ्या इतर मित्रपरिवारांना वृक्षारोपणाची संकल्पना सुचवली. सगळ्यांना ती खूप आवडली व सुरुवात आपल्या भागातून करायची असे ठरले. 

पावसाळ्यात वृक्षारोपणाला चांगला वाव असल्याने आमची टीम कामाला लागली. मात्र हद्दीचा वाद अडथळा ठरू लागला. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी महापालिका व खडकी कॅंटोमेंट बोर्डाची रीतसर परवानगी देखील मागितली. त्यांनी या चांगल्या कामाला नाही म्हटले नाही. त्यानंतर आम्ही रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकामध्ये रोपे लावण्याचे ठरवले. मात्र त्या दुभाजकाच्या मध्ये तुटके सिमेंटचे तुकडे, रस्त्याच्या कामाचा राडारोडा, मद्याच्या बाटल्या असा मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता, तो प्रथम आम्हाला हटवायचा होता. मात्र हे काम आपल्याला जमणार नाही, हे समजून आम्ही दोन कामगार स्वखर्चातून नेमले व दुभाजकातील सगळा कचरा साफ करून घेतला. त्यानंतर विकत माती, रोपे, खत आणले व वृक्षारोपण केले. आम्ही आतापर्यंत पन्नासच्या वर रोपे वाकडेवाडीतील बजाज उद्यान, कोहिनूर इस्टेट परिसर, मुळा रस्ता, अंडी उबवणी केंद्र आदी भागात लावली आहेत. या आमच्या ग्रुपमध्ये आबालवृद्धांचा समावेश असल्याने सगळेजण आनंदाने काम करत आहेत. जशी रोपे लावली आहेत तशी त्यांची देखभाल करण्याची शपथ देखील ग्रुपने घेतली आहे. या ग्रुपमध्ये तुषार गांधी, डॉ. किरण मुथा, प्रमोद चौरे, निलेश नितनवरे, संतोष ओहळ, दीपक थोरात, संजय कांबळे, बाळासाहेब निंबाळकर, विनू मारी, सुनील गायकवाड, सतीश मेदनकर, राजेश गांधी आदींचा सहभाग आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.