पुणे : सराफी दुकानांमध्ये ठराविक वजनाचे दागिने खरेदी केल्यानंतर दुकानदारांना "फोन पे' द्वारे ऑनलाईन पैसे दिल्याचे भासवून 50 हून अधिक दुकानदारांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्य ठगाला हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपीने आत्तापर्यंत अशा स्वरुपाचे नऊ गुन्हे केले असून सराफी व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)
विशाल माणिक घोडके (वय 28, रा. होलेवस्ती, उंड्री) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर वर्मा यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा यांचे हडपसर येथे सराफी दुकान आहे. त्यांच्या सराफी दुकानातुन 24 जानेवारीला आकाश तुपे या नावाच्या व्यक्तीने पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी खरेदी केली. त्यानंतर त्याने "फोन पे' द्वारे पैसे देत असल्याचे सांगून त्यांना पैसे दिल्याचा मेसेज दाखविला.
दरम्यान, व्यवहाराची नोंद घेत असताना त्या ग्राहकाचे पैसे जमा झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिसांकडून सुरु होता. दरम्यान याच पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागातील सराफी व्यावसायिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडू लागल्या होत्या. हडपसर पोलिसांनी संबंधित प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी वर्मा यांची फसवणूक करणारा व्यक्ती हा आकाश तुपे नसून विशाल घोडके असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास उंड्री परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने मागील दोन महिन्यांपासून याच पद्धतीने शहरातील सराफी व्यावसायिकांना गंडा घातल्याची माहिती दिली.
हडपसर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. तेव्हा, त्याने विविध ठिकाणी नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घोडके याने ऑनलाईन व्यवहारातील "फोन पे' चा स्क्रिन शॉट वापरून 14 लाख रुपयाहून अधिक व्यवहार केल्याचे तसेच 50 हून अधिक सराफी व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, शाहीद शेख यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
तांत्रिक कौशल्याचा वापर करुन करीत असे फसवणूक
घोडके हा उच्चशिक्षीत असल्याने त्याला मोबाईल तंत्रज्ञानाची चांगली माहिती आहे. नातेवाईक, मित्रांच्या लग्न, विविध प्रकारचे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये भेटवस्तु देण्याच्या बहाण्याने तो सराफी दुकानांमध्ये जाऊन सोने खरेदी करण्याचा बहाणा करीत होता. "फोन पे'वरील ठराविक पैसे दिल्याचा स्क्रिनशॉट त्याने काढून ठेवलेला होता. तेवढ्याच पैशात येऊ शकणाऱ्या पाच ग्रॅम वजन असलेली सोन्याची अंगठी तो खरेदी करीत होता.
खरेदीनंतर "फोन पे' द्वारे पैसे देत असे. परंतु त्याच्या खात्यावर पैसे नसल्याने संबंधित व्यवहार रद्द होत होता. तरीही व्यवहार रद्द झाल्याचा मेसेज त्याला प्राप्त होत असे. तसेच फेरफार केलेल्या स्क्रिन शॉटवरील युटीआर क्रमांक तो दुकानदारांना देत असे. त्यामुळे संबंधीत दुकानदारांना व्यवहार झाला असल्याचे वाटत असे. तसेच सराफी व्यावसायिकांचा विश्वास बसावा, यासाठी तो स्थानिक गावकऱ्यांचे आडनाव स्वतः लावत असे. या प्रकारामुळे अनेक सराफी व्यावसायिक त्याच्या जाळ्यात सहज अडकत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.