Hadapsar News - ससाणेनगर रस्त्यावरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. त्याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यवसायिकांसह सर्वच प्रवाशांना बसत आहे.
त्यासाठी या रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, रस्ता रूंदीकरण करणे, उलट दिशेने होणारी वाहतूक बंद करणे व वाहतूक नियंत्रण प्रभावी करणे, अशा उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबविण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
हडपसरच्या दक्षिणेकडे मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. दररोज ते वाढतच आहे. त्या बाजूला जाण्यासाठी एकमेव जवळचा मार्ग म्हणून ससाणेनगर रस्ता आहे. मात्र, सध्या हा रस्ता अरूंद असण्यासह विविध अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.
त्यामुळे या भागात दररोज सकाळी व संध्याकाळच्या सुमारास मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होऊन प्रवाशांना तासनतास त्यात अडकून पडावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार व व्यवसायिकांना त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे रूंदीकरण गेली अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यातच अगोदरच अरूंद रस्त्यावर शेजारील व्यवसायिकांचे व्यवसाय रस्त्यावर अतिक्रमण करून थाटले आहेत. पथारी, फळ विक्रेत्यांनी त्यात आणखी भर टाकली आहे.
या व्यवसायिकांसमोर ग्राहकांची वाहने उभी केली जात आहेत. वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे हडपसर गावातून मगरआळी, गांधीचौक व पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केटकडून उलट दिशेने येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय पालिकेकडून रस्त्यावर वारंवार केल्या जाणाऱ्या कामाच्या नियोजनाचा अभाव येथील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहे.
"अगोदरच अरूंद रस्ता त्यातच, रासगे आळी चौकाजवळ झाडाच्या कोपऱ्यावर पक्के बांधकाम चालू आहे. त्यामुळे हा चौक आणखी लहान होत आहे. येथील बेकरीजवळ, फळ विक्रेत्यासमोर ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत.
पंक्चर दुरूस्तीचे कामही रस्त्यावरच होत आहे. त्यामुळे अडथळा होऊन कोंडीत भर पडत आहे. आम्ही नेमका प्रवास करायचा कोठून,' असा सवाल प्रकाश डांगी, संदीप राऊत, मयूर मते, सुल्तान बागवान, महेश बनकर, अनूप लोंढे यांनी केला आहे.
"सम्राट चौक, रासगे आळी चौक, नवनाथ तरुण मंडळ चौक या ठिकाणी दररोज सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कर्मचारी असलाच पाहिजे. यासाठी हडपसर वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत आहे.'
महेंद्र बनकर, स्थानिक नागरिक
"भाजी मार्केट जवळील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण जरुरी आहे. विक्रेते दुकानांसमोर थेट रस्त्यामध्ये विक्री साहित्य मांडतात. ग्राहकांची वाहनेही रस्त्यातच उभी राहतात. ऑटोरिक्षाही रस्त्यातच प्रवाशांची प्रतिक्षा करतात. सोलापूर रस्त्यापासून कालव्यापर्यंत रुंदीकरण झाले पाहिजे.'
गणेश ससाणे, स्थानिक रहिवासी
"पालिका व पोलिस प्रशासन निष्ठूर झाले आहे. समन्वय व नियोजनही नाही. तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. दररोजच्या या कोंडीने आम्ही प्रवासी हैराण झालो आहोत.
प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना न केल्यास आम्ही सामान्य नागरिक एक होऊन आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू.' असा इशारा अनिकेत राठी, संदीप घुले, राजेश शेलार, विभास जाधव, विश्वास रासगे, तृप्ती टिळेकर यांनी दिला आहे.(Latest Marathi News)
"हद्दीतील बारा ठिकाणी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामध्ये ससाणेनगर रस्ताही आहे. या ठिकाणी पूर्णवेळ नियंत्रक देणे शक्य होत नाही. पालिकेला अतिक्रमण हटविणे, दिशादर्शक व वाहतूक नियंत्रणाबाबतचे फलक लावणे आदी नियोजनासाठी वेळोवेळी संपर्क केला आहे. या ठिकाणी वॉर्डन मिळाले तर एक कर्मचारी देऊन वाहतूक नियंत्रण शक्य होईल.'
सुनील जाधव. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.