समांतर पूल एप्रिलमध्ये खुला

दापोडी - हॅरिस पुलाजवळ बांधण्यात येणाऱ्या समांतर पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू असताना.
दापोडी - हॅरिस पुलाजवळ बांधण्यात येणाऱ्या समांतर पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू असताना.
Updated on

पिंपरी - हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम वेगाने सुरू असून, येत्या एप्रिलमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना दोन पूल उपलब्ध होतील. 

बोपोडी येथील झोपडपट्टीचे जुलैमध्ये स्थलांतर झाल्यानंतर या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले. मात्र, पावसाळ्यानंतरच काम वेगाने सुरू झाले. झोपडपट्टी काढल्यानंतर त्याजागी पुलासाठी संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासोबतच पोच रस्त्यासाठी मुरूम व खडीचा भराव टाकण्यास सुरवात झाली. मुळा नदीकाठच्या रस्त्यालगत पुलाचा शेवटचा खांब बांधण्यात येत आहे. खांबाचे बरेचसे काम झाले आहे. त्यानंतर सध्या बांधलेल्या पुलापासून या खांबापर्यंतचा स्लॅब टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल. हे सर्व बांधकाम फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्यात येईल.

संरक्षक भिंत बांधल्यानंतर पोच रस्त्याचे काम सुरू होईल. दोन्ही बाजूच्या पोच रस्त्याचे डांबरीकरणही फेब्रुवारीपर्यंत संपविण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर पुलावरील संरक्षक कठडे, पदपथ व विद्युतविषयक कामे मार्चमध्ये केली जातील.

हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे २०१६ मध्ये सुरू झाला. त्यांना दोन वर्षांची मुदत होती. प्रकल्पाचा खर्च दोन्ही महापालिका करणार आहेत. पिंपरीकडून पुण्याकडे येणारा नवीन पूल दोन जुलै २०१८ रोजी वाहतुकीला खुला करण्यात आला. बोपोडीतील झोपडपट्टीच्या स्थलांतराला विलंब झाल्यामुळे पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाला मे २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

पिंपरीमध्ये दहा लेनचा रस्ता आहे. हॅरिस पुलाला समांतर पूल उभारल्यानंतर दोन्ही बाजूला ये-जा करण्यासाठी प्रत्येकी चार लेन उपलब्ध होतील. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढेल. बोपोडी व खडकीमध्ये पुणे-मुंबई रस्ता २१ मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे त्या दीड किलोमीटरच्या अंतरात वाहतूक कोंडीची समस्या राहील. त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्याला संरक्षण विभागाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही.

हॅरिस पुलाच्या समांतर पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या चार महिन्यांत ते काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर, तेथे चार पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. सीएमईजवळ भुयारी मार्ग बांधण्यात येत असल्यामुळे, या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
- विजय भोजने, बीआरटी विभागाचे प्रवक्ते, महापालिका

दोन पुलांचा खर्च - २२.४६ कोटी रुपये
पुलाची लांबी - २०२ मीटर
पुलाची रुंदी - १०.५ मीटर
पोच रस्ता (पुणे बाजू) - १४५ मीटर
पोच रस्ता (पिंपरी बाजू) - ६४.७ मीटर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.