आरोग्य केंद्रांतील रुग्णसंख्येत वाढ; राष्ट्रीय मानांकनात आघाडी
पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतिपदाच्या कार्यकाळात बांधकाम विभागात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करण्यात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात मोठे यश आले. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बाह्यरुग्णांच्या संख्येत पूर्वीपेक्षा दुपटीने वाढ झाली. सरकारी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या प्रसूतींमध्ये वाढ झाली. दर्जेदार आरोग्य सुविधांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्यातून जिल्ह्यातील 50 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले. एवढ्या मोठ्या संख्येने हे मानांकन मिळवणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचे या समितीचे सभापती मंगलदास बांदल यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात बांधकाम आणि आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि विकासकामांसाठी एकूण 581 कोटी 15 लाख 79 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये विविध बांधकामांसाठी 434 कोटी 98 लाख 25 हजार रुपये तर, आरोग्यविषयक सुविधांसाठी 146 कोटी 17 लाख 54 हजार रुपये निधी खर्च झाला. सभापतिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाने पूर्ण समाधानी असल्याचे बांदल यांनी सांगितले.
बांदल म्हणाले, "महिलांच्या रक्तांमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी अभियान, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी वैभवलक्ष्मी योजना, शालेय विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासणीसाठी मोहिमा राबविल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांत सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यातील बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व घटकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांची "कायापालट' योजनेसाठी निवड केली.''
बांधकाम विभागामार्फत शिरूर, बारामती, पुरंदर, आंबेगाव, भोर, वेल्हे, मावळ आणि जुन्नर या आठ पंचायत समित्यांसाठी नवीन इमारती बांधल्या. ग्रामीण रस्त्यांचा विकास, रस्ते विशेष दुरुस्ती, आदिवासी किमान गरजा कार्यक्रम आणि जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून रस्त्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन इमारतींचे बांधकाम, उपकेंद्र दुरुस्ती, विद्युतीकरण, प्रयोगशाळा आधुनिकीकरण, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम व दुरुस्ती आदी कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली.
शिबिरांचा 85 हजार रुग्णांना लाभ
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये 85 हजार रुग्णांवर औषधोपचार व आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कर्करोग, किडनी आणि हृदय विकार झालेल्या 893 रुग्णांना उपचारासाठी 1 कोटी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
आरोग्य केंद्रांचा प्रगती अहवाल (वर्षातील आकडे)
संस्थात्मक प्रसूतींची संख्या : 17653 (पूर्वी 9320)
आंतररुग्ण : 1 लाख 81 हजार 150 (पूर्वी 53 हजार 430)
बाह्यरुग्ण : 23 लाखांच्या पुढे (पूर्वी 10 लाख)
मुलींचे जन्माचे प्रमाण : 928 (पूर्वी 847 दर हजारी पुरुषांमागे) |
|