Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

rain in pune
rain in pune
Updated on

पुणे - दुपारनंतर सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सायंकाळी मात्र तांडव नृत्य सुरू केले. उपनगराला वरुणराजाने अक्षरशः झोडपून काढले. सर्वच रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. पुणे-अहमदनगर रस्त्यावर पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने एक दुचाकीस्वार वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अनेक सोसायट्या, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली, तर अनेकांसाठी मागील वर्षीच्या पुराच्या आठवणीने रात्र वैऱ्याची ठरली. 

कोथरूडमधील नाल्यालगतच्या घरांत पाणी
कोथरूड : रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोथरूडमध्ये अनेक भागांत पाणी शिरले. म्हातोबादरा,  सुतारदरा, सागर कॉलनी,  लालबहादूर शास्त्री कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिवांजली मित्र मंडळ,  यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर येथील नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी  शिरून मोठे  नुकसान झाले. काही ठिकाणी सीमाभिंती पडल्या असून, सर्व रस्ते जलमय झाल्याने पाणी दुचाकीत शिरून गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या.

पहाटे तीनपर्यंत लोक घरातील पाणी बाहेर काढण्यात व्यग्र होते. जयभवानीनगर येथे चाळ क्रमांक २ व ३  मध्ये फरशी खालून पाणी वर येत होते. येथील पावसाळी वाहिनीचे काम करण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली.

कुंबरेपार्क येथे तळमजल्यात पाणी साचले होते. तेथेच वीज मीटर असल्याने रहिवासी भयभीत झाले होते.  सोसायटीला लागूनच कोथरूड पीएमटी डेपो आहे,  तेथून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे संरक्षक भिंत पडल्याने  पाणी सोसायटीमध्ये घुसले.

उजवी भुसारी कॉलनीतील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. येथील नाल्यात राडारोडा असल्याने पाणी जायला जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सोसायटीच्या सीमाभिंतीला तडा गेला असून, भिंत खचली आहे.

उजवी भुसारी कॉलनीमधील पुरुषोत्तम सोसायटीमध्ये पाणी साचले आहे. डावी भुसारी कॉलनीतील सुवर्णनगरी सोसायटीलगत खोदकाम सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहाने सीमाभिंत पडली. पाण्याच्या टाकीत माती व चिखल गेला. एकलव्य कॉलेजकडून येणारे पाणी शांतीबन सोसायटीमध्ये शिरत आहे.  सहकारवृंद सोसायटीलगत असलेली लष्कराची भिंत पडली. त्यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

नगरसेविका अल्पना वरपे यांनी सांगितले की, अर्धवट झालेल्या नालेसफाईमुळे धोका उत्पन्न होवू शकतो  याबद्दल सकाळीच कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना कळवले होते. महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सिंहगड रस्त्यावर नागरिकांची कसरत
सिंहगड रस्ता- मुसळधार पावसामुळे एकतानगरी, विठ्ठलनगर परिसरात भिंत पडली असून विश्रांतीनगर, हिंगणे, खोराडवस्ती, साईनगर भाग जलमय झाला होता. हिंगणे ते आनंदनगर भा. द. खेर चौक दरम्यानदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामारे जावे लागले. प्रयेजा सिटीकडे जाणारा पूल पुन्हा एकदा वाहून गेला. 

बारामती, इंदापूर, दौंड पुरंदरला अतिवृष्टीची सर्वाधिक झळ!

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव गंभीरे, उपअभियंता राहुल साळुंके, निशिकांत चाफेकर, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, सांडपाणी व्यवस्थापन कनिष्ठ अभियंता देवेंद्र राठोड, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संभाजी खोत, यांच्यासह नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप, अभिजित कदम, बाळासाहेब आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

बाणेर-बालेवाडी परिसरात रस्ते जलमय
बालेवाडी- बाणेर, बालेवाडी परिसरास मेघगर्जनेसह  झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागातील काही सोसायट्यांच्या  वाहनतळांमध्ये पाणी घुसल्याने सभासदांची तारांबळ उडाली. परिसरातील अनेक रस्त्यांना जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बाणेर-बालेवाडी परिसरातून वाहणाऱ्या मुळा नदी, तसेच राम नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.  मुळा  नदीचे पाणी स्मशानभूमीच्या पायऱ्यांपर्यंत आले होते.  पाणी पातळी वाढल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये गतवर्षीच्या पावसाची आठवण होऊन भीतीचे सावट उमटले होते. बाणेर येथील कपिल मल्हार सोसायटी, रोलिंग हिल्स सोसायट्यांच्या वाहनतळांमध्ये पावसाचे पाणी घुसले. कपिल मल्हार सोसायटीतील सभासदांनी वाहनतळामध्ये जसे पाणी वाढू लागले, तशी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविली.

वारजेकरांची उडाली धांदल  
वारजे- कर्वेनगर, वारजे भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने वारजेकरांची धांदल उडाली. माळवाडी, पॉप्युलरनगर, अतुलनगर, सेवा रस्ता, राजयोग सोसायटी, गीतगंगा सोसायटी, तसेच वांजळे उड्डाणपूल, कर्वेनगर येथील उड्डाण पुलाजवळ पाणी साचल्याने रस्त्याला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. सकाळी पाऊस शांत झाल्यानंतर घरात साचलेले पाणी उपसताना नागरिक दिसत होते. दरम्यान, एवढी परिस्तिथी निर्माण होऊन महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी या भागात फिरकले नसल्याची तक्रार दत्तात्रेय चौधरी यांनी केली आहे.

किरकटवाडीतील ‘त्या’च पुलाने यंदाही केला घात
किरकटवाडी :
येथील ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी शिवनगर भागातील अनेक घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमी उंचीच्या लोखंडी पुलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकल्याने ही दुर्घटना घडली. नागरिकांना आपला जीव वाचविण्यासाठी कित्येक तास घराच्या छतावर बसून राहावे लागले.

किरकटवाडी गावठाण व शिवनगर येथील मावळे आळी या भागाला जोडणारा एक कमी उंचीचा अरुंद लोखंडी पूल काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. मावळे आळी येथील वीस ते पंचवीस घरांसाठी हा एकमेव रस्ता आहे. मागील वर्षी २५ सप्टेंबर  रोजी किरकटवाडी व परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मावळे आळी येथील याच लोखंडी पुलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकून अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. तेरा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. प्रशासनाने ही घटना टाळण्यासाठी एक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न केल्यामुळे काल झालेल्या अतिवृष्टीमध्ये पुन्हा अनेक घरांचे नुकसान झाले.

पूर्णपणे पाण्याने वेढलेल्या घरांच्या छतावरून प्रशासनाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत होते. पोलिस निरीक्षक अशोक शेळके हे याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मावळे आळीच्या समोरील संरक्षक भिंत तोडून तुंबलेले पाणी काढून दिले.

‘आमच्या रस्त्याच्या समस्येबाबत अधिकारी व पदाधिकारी कोणीही दखल घेत नाही. ओढ्याचे पाणी शिरल्यानंतर आम्हाला बाहेर पडण्यासाठी कोणताही रस्ता नाही. दोन महिन्यांच्या लहान बाळाला घेऊन जीव मुठीत धरून छतावर जाऊन थांबावे लागले. प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहत आहे काय ? -अतुल गायकवाड, रहिवासी, मावळे आळी, किरकटवाडी.

औंध परिसरात  अनेकांनी  जागविली रात्र
औंध- बोपोडी, औंध, सकाळनगर, पंचवटी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस रस्ता, सुतारवाडी, महाळुंगे परिसरात मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पाषाण येथील बालाजी चौकाजवळील माँटव्हर्ट सोसायटीशेजारील जवळपास तीस घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. त्याचबरोबर औंधमधील इंदिरा गांधी वसाहत, कस्तुरबा गांधी वसाहत येथील घरांतही पाणी शिरल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले. अशीच परिस्थिती सकाळनगरमधील बाणेर रेसिडेन्सी या इमारतीत चेंबर तुंबल्याने पाणी शिरल्याने रहिवाशांनी अनुभवली; तर औंध, पाषाण, महाळुंगे, सुतारवाडी परिसरात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर घाण व गाळ आल्यामुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते.

वाघोलीत युवकाचा मृत्यू
पुणे- मुसळधार पावसामुळे पुणे- नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्यात दुचाकीवरील तरुण वाहून गेल्याची घटना वाघोलीतील कावेरी हॉटेलजवळ बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने दोन महिला वाचल्या. चार ते पाच दुचाक्‍या वाहून गेल्या आहेत. बुजविलेले ओढे-नाले व पीएमआरडीएचा हलगर्जीपणा या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी केला आहे. निमित अशोक अहेरवाल (वय २१, रा. सणसवाडी) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमित हा दुचाकीवरून चंदऩनगरच्या दिशेने जात होता. हॉटेल कावेरीजवळ नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे तो ओढ्याच्या दिशेने वाहून गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.  सकाळी त्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. 

Pune Rains : पिंपरी-चिंचवडमधील रस्ते पाण्याखाली, घरांमध्येही शिरले पाणी

निमित हा मावशी व अन्य एका महिलेला पुणे स्टेशनवर सोडण्यासाठी दुचाकीवर घेऊन जात होता. त्याची मावशी व अन्य दोघे जण गावी जाणार होते. त्याच्या दुचाकीच्या मागेच त्याचे दाजी काही अंतरावर दुसऱ्या दुचाकीवर होते. 

हॉटेल कावेरीजवळ आल्यानंतर त्याने त्या महिलांना दुचाकीवरून उतरविले. ‘तुम्ही चालत या, मी दुचाकीवर पुढे जातो’ असे तो म्हणाला. त्या महिला खाली उतरल्या. तो मात्र पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वाहून गेला. तो सणसवाडी येथे आपली आई व बहिणीसोबत राहत होता. तो अविवाहित होता, अशी माहिती त्याचे दाजी सुभाष चौधरी यांनी दिली. 

चंदननगर पोलिस ठाणे रात्रभर पाण्यात
पुणे : कर्तव्य बजाविताना नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल न  होता आपली जबाबदारी चोखपणे बजावणाऱ्या पुणे पोलिसांचा काल प्रत्यय आला. रात्री पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका चंदननगर पोलिस ठाण्याला बसला. कमरेइतके पावसाचे पाणी पोलिस ठाण्यामध्ये शिरले असतानाही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर टेबलावर बसून आपले कर्तव्य पार पाडले. चंदननगर पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी शिरल्याने टेबलाखाली ठेवलेल्या फायली पाण्यात तरंगत होत्या. काही संगणकात पाणी शिरल्याने संगणक उचलताना विजेचा धक्का बसत होता. अशावेळी जिवाची पर्वा न करता जेवढे शक्‍य होईल तेवढ्या वस्तू वाचविण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. पाण्याला जाण्यासाठी वाट करून दिल्यावर सकाळपर्यत पाणी ओसरले. सकाळपासुन पोलिस ठाण्यामध्ये चिखल, गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचे चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.

(वृत्तसंकलन- जितेंद्र मैड, नीलेश बोरुडे, जागृती कुलकर्णी, शीतल बर्गे, महादेव पवार, बाबा तारे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.