Katewadi News : यादवकालीन वाबळे घराण्याचा इतिहास उजेडात

मुढाळे (ता. बारामती) येथील श्री मुर्डेश्वर महादेव मंदिरावर कोरीव स्वरूपाचे शुद्ध मराठीतील दोन शिलालेख आढळून आले आहेत.
Inscription
Inscriptionsakal
Updated on

काटेवाडी - मुढाळे (ता. बारामती) येथील श्री मुर्डेश्वर महादेव मंदिरावर कोरीव स्वरूपाचे शुद्ध मराठीतील दोन शिलालेख आढळून आले आहेत. यापैकी एक शिलालेख हा उत्तर यादवकालीन बहामनी राजवटीतील आहे. त्यामुळे सुमारे ६५८ वर्षांपूर्वीच्या या शिलालेखामुळे इतिहासकालीन वाबळे घराण्याच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे.

मुढाळे येथील श्री मुर्डेश्वर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूस मुख्य दरवाज्यावर दुसरा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून, ६ ओळीचा अशुद्ध देवनागरी लिपीतील मराठी भाषेत आहे. शिलालेखाच्या अक्षरावर वातावरणाचा, तसेच रंगरंगोटी परिणाम झाला आहे. काही अक्षरे पूर्णपणे झिजली आहेत. तर, काही अक्षरे अस्पष्ट असून, सहज वाचता येत नाहीत. शिलालेख वाचनासाठी इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे यांना अमोल बनकर, अनिकेत रजपूत, विनोद खटके मनोज कुंभार यांचे सहकार्य लाभले.

शिलालेखांवरील मजकूर

लेखात बऱ्याच ठिकाणी संक्षिप्त रूपे दिली आहेत. शालिवाहन शकाच्या १२६४ व्या वर्षी (चित्रभानु पाहिजे) विकरी संवत्सरात श्रावण शुद्ध ५ म्हणजेच म्हणजेच ८ जुलै १३४२ रोजी सोमवारी नागपंचमीच्या दिवशी येथील धारणाक वाबळे यांनी श्री मुर्डेश्वर महादेवाचे शिवमंदिर बांधले आहे. शिलालेखाची सुरुवात ‘स्वस्ति श्री’ने झालेली असून, लेखात मुर्डेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख आहे. आजही या मंदिराचे नाव मुर्डेश्वर महादेव मंदिर असेच आहे.

हे मंदिर शिवाचे असून, श्रावण महिन्याच्या पंचमीला म्हणजेच नागपंचमीला बांधलेले आहे. या शिलालेखाच्या खाली अजून एक शिलालेख असून, तो शके १६९१ विरोधी ऋतू संवत्सरातील असून, त्यात सुरुवातीला श्री स्थापना धारनाक वाबळे यांनी केली, असा उल्लेख आहे. धारनाक वाबळे हा कदाचित वाबळे घराण्याचा मूळ पुरुष असून, त्याच्या विविध शाखांचा विस्तार महाराष्ट्रात झाला आहे.

४२७ वर्षांनंतर मंदिराचा जीर्णोद्धार

मुर्डेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस मुख्य दरवाजावर हा शिलालेख कोरलेला आहे. मुर्डेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार वाबळे घराण्यातील गावाचे तत्कालीन मोकदम यमाजी वाबळे पाटील यांचे पुत्र यशवंतराव वाबळे यांनी केल्याची माहिती शिलालेखावर कोरण्यात आली आहे. ७ एप्रिल १७६९ शुक्रवार; तर दुसऱ्या शिलालेखावर २७ मार्च १७७० मंगळवार, असा काळ दर्शवला आहे.

छत्रपती धाकटे शाहू महाराज व माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीतील हे शिलालेख आहेत. तसेच, या शिलालेखावर धारनाक वाबळे या वाबळे घराण्यातील मूळ पुरुषाचादेखील उल्लेख आढळतो. धारनाक वाबळे यांनी शके १२६४ मध्ये मुर्डेश्वर महादेवाचे मंदिर बांधले होते. पुढे ४२७ वर्षांनंतर त्यांच्या पिढीतील यमाजी वाबळे यांचा पुत्र यशवंतराव वाबळे याने मंदिराचा जीर्णोद्धार केला.

पुणे जिल्ह्यात यादव काळातील शिलालेख फार मिळत नाहीत. त्यामुळे हा शिलालेख अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा लेख शक, संवत्सर, मास, पक्ष तिथीने युक्त आहे. संवत्सर मात्र चुकले आहे. विकारी ऐवजी चित्रभानु पहिजे. याच बरोबर शिलालेखात धारनाक हे एक व्यक्तिनाम आलेले असून, त्यांनी हे मंदिर बांधले, असा उल्लेख आहे. याच बरोबर लेखाच्या शेवटी मंगल महस्री शुभं भवतु लिहिले आहे, म्हणजे याचा अर्थ ‘मंगल होवो शुभ होवो तुमचे कल्याण होवो’ असा होतो, पण हे धरनाक कोण आहेत, याची माहिती लेखात नाही.

- अनिल दुधाणे, इतिहास अभ्यासक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.