Hoarding Collapsed : मोशीत महामार्गालगतचे होर्डिंग कोसळले; वादळी वाऱ्यामुळे घटना

मुंबईच्या घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ताजी असताना गुरुवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मोशी येथे होर्डिंग कोसळले. पाऊस व वाऱ्यामुळे ही घटना घडली असून जीवितहानी झालेली नाही.
Hoarding Collapsed
Hoarding Collapsedsakal
Updated on

पिंपरी/मोशी : मुंबईच्या घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ताजी असताना गुरुवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मोशी येथे होर्डिंग कोसळले. पाऊस व वाऱ्यामुळे ही घटना घडली असून जीवितहानी झालेली नाही. मात्र, एक दुचाकी, एक टेम्पो आणि एका व्यावसायिक मोटारीचे नुकसान झाले.

पुणे-नाशिक महामार्गावर मोशीकडून पुण्याकडे येणाऱ्या सेवा रस्त्यावर राजा शिवछत्रपती चौकालगत (वखार महामंडळ चौक) पाच होर्डिंग्ज आहेत. त्याखाली पत्राशेडची दुकाने आहेत. त्यात गॅरेज, गोदाम, हॉटेल, औषधे आदींचा समावेश आहे. पाचपैकी एक होर्डिंग कोसळले. त्याखाली एक दुचाकी, एक टेम्पो व एक मोटार सापडली. दुचाकी, टेम्पोचे अधिक नुकसान झाले.

टेम्पो व पत्राशेडमधील दुकानांवर होर्डिंग अडकल्याने जमिनीपर्यंत टेकले नाही. त्यामुळे, मोटारीचे फारसे नुकसान झाले नाही. त्यात होर्डिंगच्या सळईचा एक तुकडा घुसला होता. तो बाजूला करून मोटार घेऊन चालक निघून गेला. त्यानंतर, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस कटरच्या साहाय्याने अँगल कापून होर्डिंग बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. दरम्यान, वडगाव येथील एमआयडीसी रस्त्यावरही होर्डिंग पडल्याचा प्रकार घडला. परंतु, त्यात, कोणतेही नुकसान झाले नाही.

कारवाई ठिकाणी पुन्हा होर्डिंग

किवळे येथे होर्डिंग कोसळून पाच जणांचा गेल्या वर्षी बळी गेला होता. त्यानंतर, शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई झाली होती. त्यात मोशीतील शिवछत्रपती चौकालगतच्या आठ

होर्डिंग्जचाही समावेश होता. त्यानंतर, काही होर्डिंग पुन्हा उभे राहिले आहेत. त्यातीलच एक होर्डिंग गुरुवारी कोसळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

औषध दुकान सुरूच

कोसळलेल्या होर्डिंगचा सांगडा हटविण्याचे काम सुरू असताना सर्व दुकाने बंद केली होती. महामार्गालगतच्या खांबांवरील वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र, तेथील औषध दुकान सुरूच होते. त्यात ग्राहकांची ये-जाही सुरूच होती. कोणालाही घटनेचे गांभीर्य नसल्याचे दिसत होते.

होर्डिंग मालकावर गुन्हा

मोशी येथील राजा शिवछत्रपती चौकातील अधिकृत परवानगी असलेले २० बाय ४० फूट आकाराचे होर्डिंग कोसळल्याप्रकरणी होर्डिंगचे परवानाधारक आनंद ॲडव्हर्टायझिंगचे आनंद गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

शहरातील सर्व होर्डिंग्जबाबत संबंधितांची बैठक शुक्रवारी (ता. १७) होणार आहे. शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ॲाडिट करण्यात येत आहे, तसेच अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण सुरू असून सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

- शेखर सिंह, आयुक्त,

पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.