‘गृहनिर्माण’च्या उमेदवारांनाही मिळणार निवडणूक चिन्ह;सोसायट्यांबाबत नियमावलीतील तरतुदी 

‘गृहनिर्माण’च्या उमेदवारांनाही मिळणार निवडणूक चिन्ह;सोसायट्यांबाबत नियमावलीतील तरतुदी 
Updated on

पुणे - अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी केलेल्या नियमावलीमध्ये नव्याने काही तरतुदी केल्या आहेत. त्यानुसार आता संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पॅनेल असल्यास उमेदवारांना निवडणूक चिन्हही (राजकीय पक्षाचे चिन्ह वगळता) मिळणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यास प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. मात्र, अंतिम नियमावली जाहीर झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

राज्य सरकारने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांनी निवडणूक स्वत:च घ्यावी, असा निर्णय घेतला होता. परंतु ही निवडणूक कशी घ्यावी, याबाबतची नियमावली प्रसिद्ध करण्यास दीड वर्षाचा कालावधी लागला. अंतिम नियमावलीनंतर गृहनिर्माण सोसायट्यांना सभासदांची मतदारयादी अद्ययावत करावी लागणार आहे. वारसदारांची नावे अद्ययावत करणे, सहसभासद आणि आवश्यकता असल्यास मूळ सभासदांच्या संमतीने सहयोगी सभासदांचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत. पाच वर्षांत किमान एका वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर असलेल्या आणि पूर्ण मेन्टेनन्स भरलेल्या सभासदाला क्रियाशील सभासद म्हणता येईल. 

गृहनिर्माण सोसायट्यांना संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारीही नेमावे लागणार आहेत. याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करावा लागेल. या निवडणूक अधिकाऱ्यांना पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाच्या वतीने मार्च महिन्यात प्रशिक्षण देणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदारयादी जाहीर करणे, त्यावर दहा दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना मागविण्यात येतील. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर नियमानुसार निवडणूक घेता येईल. निवडणूक पार पडल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विशेष सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात येतील. तसेच, नवीन संचालक मंडळाकडे कार्यभार सोपविता येणार आहे. 

सहयोगी सभासदानांही निवडणूक शक्य 
गृहनिर्माण सोसायटीतील मूळ सभासदाच्या संमतीने सहसभासदाला निवडणूक लढविता येते. तसेच, राज्य सरकारच्या २०१९ च्या अध्यादेशानुसार मूळ सभासदाच्या परवानगीने सहयोगी सभासदांना संचालक मंडळाची (व्यवस्थापकीय समिती) निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. सहयोगी सभासदांमध्ये पत्नी, आई-वडील, बहिण, भाऊ, मुलगा, मुलगी, जावई, सून, भाचा, भाची यांनाही निवडणूक लढविता येणार आहे. परंतु त्यासाठी मूळ सभासदाने संमती (१० ए) अर्ज भरून देणे आवश्यक आहे. याबाबत नियमावलीत तरतूद कायम ठेवल्याची माहिती पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी दिली. 

राज्य सरकारने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीबाबत २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारणार आहेत. अंतिम नियमावली प्रसिद्ध केल्यानंतर त्यानुसार सोसायट्यांना निवडणूक प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे. 
- नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.