'भाई: व्यक्ती की वल्ली'मध्ये हिराबाई बडोदेकरांचे चारित्र्यहनन: प्रभा अत्रे

Hirabai Barodekar
Hirabai Barodekar
Updated on

पुणे : पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात गानहिरा हीराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप ज्येष्ठ गायिका व हीराबाईंच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी केला आहे. 'भाई हा चित्रपट हीराबाईंच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करणारा व त्यांचा घोर अपमान करणारा आहे, त्यामुळे हा चित्रपट बघून खूप वाईट वाटले व राग आला.' असे मत अत्रे यांनी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हीराबाई या प्रभा अत्रेंना गुरूस्थानी होत्या. 1947 पासून त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. हीराबाई या अत्यंत शालीन, सौम्य, मृदु पण भारदस्त होत्या. आजही त्यांचा उल्लेख एक 'आदर्श स्त्री कलाकार' म्हणून केला जातो. तसेत पुलं, भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे यांच्यापेक्षा 15 ते 20 वर्षांनी मोठ्या होत्या. या सर्वांना त्या गुरूस्थानी होत्या, तरीही चित्रपटात हे सगळे हीराबाईंचा एकेरी नावाने उल्लेख करताना दाखवले गेले आहे. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री ही त्यांच्या सम वयाची दाखवली आहे. तसेच तिचे हावभावही फार भडक दाखविण्यात आले आहेत, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

हीराबाईंचे घर हे सर्व लहान-मोठ्या कलाकारांसाठी स्वरमंदिर होते. पण सगळ्यात कळस म्हणजे या चित्रपटात त्यांचे घर म्हणजे दारू मिळणार जागा दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट मद्यपानावर आहे की कीय अशी शंकाही येते. हीराबाईंच्या घरी जाण्यापूर्वी पुलं, वसंतराव व भीमसेन जोशी यांच्यामधील संभाषण, तसेच दार उघडताना हीराबाईंचे बोलणे, महफिल चालू असताना दोन गाण्यांमधील पुलं, वसंतराव व भीमसेन जोशी यांच्यामधील संभाषण व अभिनय या सर्वांमुळे हीराबाईंच्या व्यक्तिमत्वाचे चारित्र्यहनन झाले आहे, असा आरोप अत्रे यांनी या प्रसिद्धीपत्रकात केला आहे. 

जेव्हा ज्येष्ठ व्यक्तिमत्वांवर चित्रीकरण करायचे असते तेव्हा दिग्दर्शकाने त्यांच्या जवळील लोकांना किंवा त्यांच्यासंदर्भात संपूर्ण माहिती असणाऱ्या लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. तसेच जबाबदारीने काळजीपूर्वक शोधकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अशा चित्रिकरणामुळे खूप चुकीचा संदेश लोकांपर्यंत जातो. मद्यपानाचे नको तितके सीन्स दाखवल्यामुळे हीराबाईंसह इतरही ज्येष्ठ कलाकारांचे चुकीचे चित्र प्रेक्षकांसमोर आले आहे. त्यामुळे या चित्रपटासंबंधित अधिकृत व्यक्ति, प्रेक्षक, शासन व या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी देणारे मंडळ या सर्वांनीच या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे, अशी भावना डॉ. प्रभा अत्रे यांनी या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.