पुणे : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादानंतर गावी निघालेल्या पत्नीला पतीने संगमब्रीज येथील पुलावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून पतीच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसम्मा नागप्पा कुंभार (वय 30, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती नागप्पा शिवप्पा कुंभार (वय 37) याला पोलिसांनी अटक केली आहे. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून नागप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. भांडणावेळी तो लहान मुलींसह पत्नीला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून बसम्मा त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या, पण गाडी न मिळाल्यामुळे त्या पुन्हा घरी निघाल्या. त्यावेळी आरोपी हा संगमब्रीज येथील न्यायाधीश बंगल्याजवळ आला. त्याने पत्नीसोबत त्या ठिकाणी वाद सुरू केले.
चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. वाद सुरू असताना कुंभारने रागाच्या भरात बसम्मा यांना पुलावरून नदी पात्रात ढकलून दिले. त्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर पडल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. खडकी पोलिस पुढील तपास करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.