पुणे : "संतांनी भारताला जोडले, राजकारण्यांनी मात्र तोडले आहे. तरीही तुम्ही कठीण परिस्थितीत असाल, तर संतांचे स्मरण तुम्हाला उमेद देते. हीच भारताची शक्ती आहे. कारण त्यात अध्यात्म आहे. ज्यांनी शक्ती, भक्तीचा प्रसार केला, त्या संतांची शिकवण आपण सर्वांनी अंगीकारली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. यामुळे देशाची सर्वांगीण प्रगती साधली जाईल," असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नामदेव अध्यासन आणि सरहद पुणे यांच्या वतीने संत नामदेव यांच्या 750 व्या जयंती वर्षात देशभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सुरवात कोश्यारी यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुषमा नहार लिखित 'गुरू ग्रंथ साहिबमधील संत नामदेव' या ग्रंथाचे प्रकाशन कोश्यारी यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, शीख समाजाचे नेते संतसिंग मोखा, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सरहदचे संजय नहार यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा : काचा फोडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पसरले आहे दहशतीचे वातावरण
भारत हा देश संतांचा आहे. भारताच्या प्रत्येक कणामध्ये शंकर आणि महिलेमध्ये देवी वसते. त्यामुळे पूर्ण देशच देवभूमी आहे, असे सांगताना कोश्यारी म्हणाले, "अनेक आक्रमणांचा आपल्याला सामना करावा लागला. पण आपण हटलो नाही, याचे कारण इथली संस्कृती, धर्म-पंथात आहे. याचा अभ्यास, इथला मानस विचारात घेऊन पाश्चात्य लोकांनी गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला. तरीही या देशाचा अस्तित्व अनादी कालापासून आहे. पण ते संपत नाही, कारण या देशाचा आत्मा भंगला नाही. या देशातून धर्म आणि अध्यात्म काढून टाकले जात नाही, तोपर्यंत देश मिटणार नाही."
डॉ. करमळकर म्हणाले, "वारकरी परंपरेचा पाइक होण्याची संधी विद्यापीठाला मिळाली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव या तीन संतांचे अध्यासन आम्ही चालवितो. देश जोडण्याचा प्रवास सव्वासातशे वर्षापूर्वी संत नामदेवांनी महाराष्ट्रातून सुरू केला, ते पंजाबमध्ये गेले. दोन संस्कृतीचा मिलाफ त्यांनी घडविला. त्यांच्या कार्याचे स्मरण विविध उपक्रमांद्वारे विद्यापीठ करणार आहे."
डॉ. मोरे म्हणाले, "संत नामदेवांनी 65 पदे पंजाबमधील प्रचलित भाषेत लिहिली आणि ती त्यांच्या धर्मग्रथांत समावेश झाला. म्हणूनच पंजाबकडे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून पाहतो. आता वारकऱ्यांनी संत नामदेवांच्या या हिंदी रचना देखील भजन- कीर्तनामध्ये वापर केला पाहिजे."
हे ही वाचा : वाघोली : आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी
नहार म्हणाले, "नामदेवांच्या राज्यातून लोक आले, तर पंजाबमध्ये पायावर पाणी टाकून स्वागत केले जाते. महाराष्ट्राविषयी एवढे प्रेम पंजाबी लोकांमध्ये आहे. ही पेरणी संत नामदेवांनी केली आणि दोन धर्म जोडले. हीच संस्कृती जोपासण्याचा आणि देशाला जोडण्याचा प्रयत्न आम्ही सरहद संस्थेमार्फत करीत आहोत.
राजेश पांडे म्हणाले, "विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना पदवी देणारा कारखाना नाही, तर त्यांना घडविणारे, संवेदनशीलता रुजविणारे ठिकाण आहे. त्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न विद्यापीठात झाला पाहिजे. त्यामुळे समाजातील सर्व स्पंदने इथे उमटली पाहिजेत. आजचा हा समारंभ त्याचे प्रतिक आहे. संतांचे विचार विद्यापीठाद्वारे यापुढे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जातील."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.