Pune Weather Department: ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती आपण नेहमीच ऐकतो. परंतु, पुण्यातीलच दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाला (आयएमडी) अजूनही ‘रडार’ बसविण्यासाठी जागा मिळत नाहीये. आयएमडीचे प्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी पुणे विज्ञान संवादात ही खंत बोलून दाखवली.
हवामानबदलांमुळे मॉन्सून बरोबरच नैसर्गिक आपत्तींत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे हवामानाचे, पावसाचे, अतिवृष्टीचे किंवा गारपिटीचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी शास्त्रज्ञ डॉप्लर रडार ही यंत्रणा वापरतात.
यामुळे अवघ्या काही मिनिटांवरचा ताजा हवामान अंदाज मिळणार आहे. पुण्यातही असा एक्स-बॅंडचा रडार बसविण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक जागा आयएमडीला अजूनही मिळालेली नाही. रडार विषयी माहिती देताना डॉ. होसाळीकर म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या शहरी हवामानशास्त्र योजने अंतर्गत आयएमडीने पुण्यात एक्स बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याचे निश्चित केले आहे.
ज्यामुळे अवघ्या काही तासांत होणाऱ्या हवामानातील बदलांना टिपले जाईल. ज्याचा थेट फायदा आपत्कालीन यंत्रणांना होणार आहे. उंचवट्यावर असलेल्या अशा जागेच्या शोधात आम्ही आहोत. कुणाकडून ती मिळालीच तर बरे होईल.’’ सध्या पुणे शहर आणि परिसराला मुंबईच्या रडावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यात काही बिघाड झाल्यास छत्रपती संभाजीनगरचा रडार उपयोगात येतो.
रडारसाठी हवी अशी जागा..
ढगांचे निरीक्षण घेणाऱ्या एक्स बॅंड रडारसाठी उंचावरची जागा हवी. शहरातील टेकडीवर हे रडार सहज बसवता येईल. त्याचबरोबर टेकडीवर थ्री फेज वीजेचा पुरवठा, रस्त्याची सुविधा आणि मोबाईल नेटवर्क आवश्यक आहे.
तसेच या ठिकाणी आयएमडीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबरोबरच राहण्याची व्यवस्था आवश्यक आहे. ऑप्टिकल फायबरही या ठिकाणी टाकावे लागणार आहे. सध्या आशा जागेच्या प्रतिक्षेत आयएमडी आहे.
रडारचा कुणाला होणार फायदा...
- पुणे शहरासह घाटमाथा आणि जिल्ह्यातील अतिवृष्टीची पूर्वसूचना मिळेल
- त्यामुळे नागरिकांसह शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा थेट फायदा होईल
- पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला आपत्ती व्यवस्थापनासाठी याचा उपयोग होईल
- आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि दरड प्रतिबंधक यंत्रणेलाही फायदा
- पुणे विमानतळालाही संचालनासाठी याचा थेट फायदा होणार आहे
- पुण्यातील हवामानाचा ऑन टाइम अंदाज मिळेल
- दीर्घकालीन हवामान संशोधनाला थेट फायदा
मॉन्सून आणि मॉन्सूननंतरही येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी आदींची सर्वात वेगवान आणि अचूक पूर्वसूचना या एक्स बॅंड डॉप्लर रडारमुळे मिळणार आहे. ज्यामुळे पुणे शहरासह घाटमाथ्यावरील हवामानाचा अधिक अचूक अंदाज मिळणार आहे. आयएमडी सध्या रडार बसविण्यासाठी उंचावरील जागेच्या शोधात आहे.
- डॉ. के.एस.होसाळीकर, प्रमुख, आयएमडी पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.