Pune Weather: पुण्यात थंडीची चाहूल; किमान तापमानात घट

Pune Weather: पुण्यात थंडीची चाहूल; किमान तापमानात घट

‘ऑक्टोबर हिट’चा चटका कमी होत गारठा काहीसा वाढू शकतो.
Published on

पुणे, ता. २३ ः गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात झालेली वाढ आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात अजून काहीशी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हिट’चा चटका कमी होत गारठा काहीसा वाढू शकतो.

पावसाने उघडीप देताच शहरात कोरड्या हवामानाची स्थिती पाहायला मिळाली. यातच गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानातही वाढ होत होती. सरासरीपेक्षा किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे किमान तापमान हे साधारणपणे २० अंशांच्या पुढे नोंदले जात होते. दरम्यान सोमवारी (ता. २३) शहरात १८.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. यंदा ऑक्टोबरमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमी किमान तापमान ठरले. आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये शहरात १९ अंशांपर्यंतच्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, बहुतांश वेळा किमान तापमान हे २० अंशांपुढेच कायम होते.

अंशतः ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. रविवारी (ता. २२) तर चक्क किमान तापमानात ४ अंशांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यात कमाल तापमानातही चढ-उतार सुरू असून उन्हाच्या झळा आणि उकाड्याची अनुभूती पुणेकरांना होत होती.

पुण्यात कोरड्या हवामानाचा अंदाज
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर शहरात येत्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात साधारणपणे १ ते २ अंशांनी आणखी घट होण्याची चिन्हे आहेत.

जळगाव १५ अंश सेल्सिअस
राज्यात ही बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट होऊ लागली आहे. सोमवारी (ता. २३) राज्यातील नीच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे १५ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता ः
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तेज’ या चक्रीवादळाच्या पाठोपाठ आता बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळाच्या निर्मितीची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची प्रणाली सक्रिय असून याची तीव्रता वाढत आहे. परिणामी, मंगळवारी (ता. २४) या प्रणालीचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते. दरम्यान, ही प्रणाली पुढे बांगलादेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

‘तेज’ची तीव्रता ः
‘तेज’ चक्रीवादळाचा भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीला कोणताही धोका नसून याची तीव्रता ११० नॉट्स इतकी आहे. हे चक्रीवादळ येमेनची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
सध्या जगात विविध महासागरांमध्ये पाच चक्रीवादळांची स्थिती निर्माण झाली असून आणखीन दोन चक्रीवादळे निर्माण होण्याच्या मार्गावर असल्याचे ‘जॉइंट टायफून वॉर्निंग सेंटर’चे (जेटीडब्ल्यूसी) विनीत कुमार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com