'संविधानात बदल, आदिवासी-मागासवर्गीयांचं आरक्षण जाणार हा अपप्रचार खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो'
'येत्या पावसाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाची आर्थिक आरक्षणाची मागणी लावून धरणार आहे.'
मंचर : घटनेत (Constitution) बदल होणार, आदिवासी व मागासवर्गीयांचे आरक्षण जाणार, असा विरोधकांनी केलेला अपप्रचार खोडून काढण्यात कार्यकर्ते कमी पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यांच्या सही शिवाय घटना बदलू शकत नाही. ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणून देण्यात काम करावे. शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. कुठल्याही आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, अशी ग्वाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. ८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) झालेल्या सहविचार सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, सुनील बाणखेले, केशरताई पवार, प्रदीप वळसे पाटील, संजय गवारी, सचिन भोर, सविता बगाटे, सुषमा शिंद, सुहास बाणखेले, आनंदराव शिंदे उपस्थित होते.
वळसे पाटील यांनी नाव न घेता खासदार अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे यांना २५ हजाराची मताधिक्य आंबेगाव मतदारसंघातून होते. पण, ते मतदारांचे आभार मानण्यासाठी परत आले नाहीत. आळंदी मेडीसिटी प्रकल्प, जुन्नरला शिवसंस्कारसृष्टी, आदिवासी भागात वनौषधी केंद्र तसेच पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचे काय झाले. हे प्रथम त्यांनी सांगावे, ते सांगितल्यानंतर मी बोलेन.
एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कामे मतदार संघात मार्गी लावली. कोरोनाच्या महाभयंकर संकटात एक हजार बेड क्षमतेचे हॉस्पिटल सुरू करून अत्यंत दुर्मिळ असलेली लस उपलब्ध करून दिली. सर्व रुग्णांची भोजन नाष्टा मोफत व्यवस्था केली. त्यावेळी खासदार कोठेही दिसले नाहीत. संकटकाळ असू किंवा विकासकामे कधीही निधी कमी पडू दिला नाही.
खासदार नसतानाही आढळराव पाटील सतत मतदारसंघातील कामे मोठ्या प्रमाणात करत होते. अशी परिस्थिती असतानाही त्यांना मताधिक्य मिळाले नाही. अशी खंत बोलून दाखवताना वळसे पाटील यांना गहिवरून आल्याचे पाहून उपस्थितांची मने हेलावली. पोपटराव गावडे, निलेश थोरात, विठ्ठल भास्कर व विष्णू हिंगे यांची मनोगते झाली. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. अंकित जाधव यांनी आभार मानले.
“येत्या पावसाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाची आर्थिक आरक्षणाची मागणी लावून धरणार आहे. यापुढे पाच वर्षानंतर नवीन कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यां समवेत चर्चा करून घेतला जाईल. नजिकच्या काळात १०० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली जातील. कार्यकर्त्यानी अंग झटून एकजुटीने उत्साहाने काम करावे.”
-दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.