पुणे, ता. ९ ः शनिवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर ठिकठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली, पालापाचोळा, राडारोडा, कचरा अक्षरशः रस्त्यावर आला, मात्र रविवारी ही कोसळलेली झाडे, कचरा ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला, चेंबरच्याभोवती पडून होता. पावसानंतर दुसरा दिवस उजाडूनही स्वच्छतेबाबत शहरातील परिस्थिती "जैसे थे' होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाला अजूनही परिस्थितीचे गांभीर्य समजून येत नसल्याची सद्यःस्थिती आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागात पावसामुळे झाडपडीच्या अनेक घटना घडला. अग्निशामक दल, स्थानिक नागरिकांकडून रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. सांयकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे तसेच रात्री उशिरापर्यंत झाडपडीच्या घटना सुरू होत्या. मात्र, या घटनेनंतर रविवारी सकाळी रस्त्यांवर, पदपथांवर पडलेली झाडे बाजूला करणे, तेथील पालापाचोळा, फांद्या, राडारोडा व अन्य कचरा उचलणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित होते. मात्र, रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व ठिकाणी "जैसे थे' परिस्थिती होती.
मुख्य व अंतर्गत रस्ते, शहरांमधील चौक, सार्वजनिक ठिकाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पडलेली असूनही तेथे स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यासमवेत आलेला कचरा, मातीचा गाळ, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु, कपडे रस्त्यांच्याकडेला पडून होता. तरीही, ते उचलण्याचे काम महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून झालेले नव्हते. या अस्वच्छतेमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता.
"शहरात झाडपडीच्या घटना खूप घडल्या आहेत, झाडे उचलण्याचे काम सुरू आहे. क्षेत्रीय कार्यालयांना देखील काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी रस्त्यांवर काम करत आहेत.' - संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.