पुणे - तुमची मुलं फक्त शाळेपुरताच मोबाईल, टॅब, लॅपटॉप वापरतात का ? या प्रश्नाचं बहुतांश पालकांचं उत्तर नाही, असंच येईल. शाळेच्या आधीच, दोन तासांमधल्या पंधरा मिनिटांमध्ये आणि शाळा संपल्यानंतरही मोबाईल, टॅबवर मुलांच्या नजरा तासन्तास खिळलेल्या असतात. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असल्याचं निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदवलंय. त्यातही चष्मा असणाऱ्या मुलांच्या डोळ्याचा नंबर वाढलाय तर, इतर मुलांना डोळ्यात जळजळ, कोरडेपणा, डोळे लाल होणे अशा तक्रारींचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांमध्ये वाढल्याचे दिसते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे नववीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एप्रिलमधील परीक्षा रद्द झाल्या. तेव्हापासून जूनपर्यंत शाळेला सुटीच होती. जूनमध्ये ऑनलाइन शाळेने सुरवात झाली. शाळेसाठी आईचा किंवा वडिलांचा मोबाईल, टॅब, लॅपटॉप अशा डिव्हाईसचा वापर होऊ लागला. पुढे-पुढे तर काही पालकांनी मुलांसाठी स्वतंत्र मोबाईल घेतला. त्यामुळे दिवसभरात किमान चार ते पाच तास मुलांच्या डोळ्यांपुढे कोणत्या न कोणत्या प्रकारचा स्क्रीन राहतोच. पण, एकदा हातात स्क्रीन आला की, तो फक्त शाळेपुरता नक्कीच राहत नाही, हा बहुतांश सर्वच पालकांचा अनुभव आहे. या प्रकारच्या ऑनलाइन शाळेला पाच महिने झाले. त्याचा थेट परिणाम चष्म्याचा नंबर वाढण्यात झाला असल्याचे निरीक्षण नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदविले.
एशियन आय हॉस्पिटलचे डॉ. वर्धमान कांकरिया म्हणाले, ""यापूर्वी नियमित डोळे तपासायला येणाऱ्या शाळकरी मुलांचा डोळ्याचा नंबर स्थिर असायचा. पण, गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये या मुलांच्या डोळ्याचा नंबर वाढलेला दिसतो. कारण, दिवसातील बहुतांश वेळ या मुलांपुढे स्क्रीन असतो. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर दिसत आहे.''
शालेय विद्यार्थ्याची आई अश्विनी पाठक म्हणाल्या, ""दुपारी बारा वाजता शाळा सुरू होते. त्यानंतर चार-पाच वाजेपर्यंत डोळ्यापुढे मोबाईल असतो. थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा असाईनमेंट अपलोड करण्याच्या निमित्ताने मोबाईल फोन घेतला जातो. या दरम्यानच्या मोबाईल फोनवरून मित्रांशी व्हिडिओ कॉल, व्हॉट्स अप चॅटिंग असतेच. त्यामुळे अभावानेच मुलं स्क्रिनपासून लांब राहतात.''
सतत डोळ्यासमोर स्क्रीन असल्याने डोळ्याचा आकार वाढतो. त्यातून आधिच्यापेक्षा चष्म्याचा नंबर वाढायला सुरवात झाली आहे.
- डॉ. वर्धमान कांकरिया, नेत्रतज्ज्ञ, एशियन आय हॉस्पिटल
सतत स्क्रिनमुळे काय होते
- डोळ्यांमधील कोरडेपणा वाढतो
- सूक्ष्म स्नायू आकुंचन पावतात
- डोळ्यांची उघड-झाप कमी होते
काय काळजी घ्यावी...
- वीस ते तीस मिनिटांचा क्लास असावा.
- प्रत्येक क्लासनंतर पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक हवा.
- सातत्याने डोळ्यांची उघड-झाप करणे.
- मैदानी खेळ खेळण्यावर भर द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.